महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या रत्नागिरी दौऱ्यावर ; रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग कामाला गती देणार?

रत्नागिरी : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. ना. गडकरी हे नाणीज येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असले तरी मागील सहा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाची ते पाहणी करणार असल्याचे बोलले जात आहे. ना. नितीन गडकरी यांच्या दौरा रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या या संभाव्य दौऱ्याची स्थानिक प्रशासनाने तयारी केली आहे.

मुंबई गोवा महामार्गाची संगमेश्वर तालुक्याच्या प्रवेशद्वारावर आरवली येथे झालेली अवस्था.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणणाचे काम सुरू असले तरी संगमेश्वर, रत्नागिरी तसेच लांजा या तालुक्यातील काम रखडले आहे. संगमेश्वरमधील आरवली ते तळेकाटे तसेच तळेकाटे येथे लांजा तालुक्यातील वाकेड या दोन टप्प्यांमधील जवळपास 90 किलोमीटरचे काम रखडले आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी कोकणातील ज्वलंत प्रश्नांसाठी झगडणाऱ्या जन आक्रोश समितीने मागील पंधरावड्यात आझाद मैदानावर जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राजाच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मंत्रालयात गेल्या आठवड्यात जन आक्रोश समितीसह कोकणातील लोकप्रतिनिधींचे महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या नाणीज येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याने ते रखडलेल्या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील करतील असे बोलले जात आहे. गुरुवारच्या आपल्या दौऱ्यात ना गडकरी महामार्ग संदर्भात नेमके काय बोलतात याकडे कोकणवासीयांचे लक्ष वेधून राहिले आहे.

या दौऱ्यात त्यांच्यासमवेत राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील सहभागी होणार आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button