चिपळूणमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

- स्थानिक नेत्याच्या मुलाच्या कारखाली पादचारी ठार
चिपळूण : मुंबई-पुणे शहरांमध्ये घडणाऱ्या ‘हिट अँड रन’च्या धक्कादायक घटना आता चिपळूणमध्येही घडू लागल्या आहेत. बुधवारी (६ ऑगस्ट) काविळतळी येथे भरधाव कारने एका पादचाऱ्याला चिरडल्याची घटना घडली. या अपघातात रमेश कळकुटकी (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. ही कार चिपळूणमधील एका स्थानिक राजकीय पक्षनेत्याच्या मुलाची असल्याची माहिती असून, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला.
अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली. ‘नेत्यांच्या मुलांना कायद्याचा धाक राहिलेला नाही का?’ असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला. अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी आरोपीने पलायन केल्यामुळे संतापाची लाट उसळली. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी काही काळ रस्ता रोखून ठेऊन निषेध आंदोलनही केलं.
या घटनेनंतर कोकणात बिनधास्त गाडी चालवण्याच्या प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपी चालकाला तात्काळ अटक करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, अपघातानंतर मध्यरात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात राजकीय पुढाऱ्यांचे पी.ए. आणि लोकप्रतिनिधी यांच्यात चर्चासत्र सुरू होते. मात्र वरिष्ठ पातळीवरून दबाव आल्यानंतर अखेर रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.