जि. प. च्या तात्पुरत्या शिक्षकांना आठ दिवसांतच केले कामावरून कमी!
पालकमंत्री सामंत यांच्या आदेशाने दिल्या होत्या नेमणुका, स्थानिकांतून संताप
रत्नागिरी : जिल्हा बदलीमुळे जिल्ह्यातील जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. हे नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक भरती करण्याचा निर्णय रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पंधरा दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार 684 शिक्षकांना नेमणुका देण्यात आल्या. परंतु आठ दिवसांतच काहींना कामावरून कमी करण्यात आल्याने या शिक्षकांतून संतापाची लाट उसळली आहे. सहाव्या टप्प्यातील परमनंट शिक्षकांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या असून यामुळे तात्पुरत्या शिक्षकांना घरी बसावे लागले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवरचे शिक्षक जिल्हा बदली करून आपापल्या जिल्ह्यात गेले. यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायचे कोणी? हा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थी असूनही शाळांवर शिकवायला शिक्षक नाहीत, अशी स्थिती होती. याविरोधात ग्रामस्थांसह पालक, लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते. अनेकठिकाणी शाळा बंंद करण्याचा इशारा देण्यात आला.
या स्थितीवर पर्याय म्हणून रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तत्काळ आदेश देत 684 स्थानिक डीएड्, बीएड् धारक व पदवीधरांना नेमणुका देण्यात आल्या. शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत नेमणुका झालेले शिक्षक शाळेत रुजूही झाले. मात्र आठ दिवस होतात न होतात तोच त्यांना कामावरून कमी करण्याचे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जारी केले आहे. सहाव्या टप्प्यातील परमनंट शिक्षकांना बदल्या देऊन त्यांना सोयीच्या शाळा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कठीण काळात शाळेसाठी कार्यरत असणार्या स्थानिकांवर अन्याय झाला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शाळेत रुजू झालेल्या या तात्पुरत्या शिक्षकांना शाळेत कार्यरत ठेवावे, अशी मागणी आता सेवा थांबवलेल्या तात्पुरत्या शिक्षकांतून होत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी तात्पुरत्या नेमणुका झालेल्या शिक्षकांतून होत आहे.
तात्पुरते शिक्षक शाळेत रुजू झाले. मात्र त्यांच्याकडून कोणताही बॉण्ड अद्याप करून घेण्यात आलेला नाही. नेमणूक केल्याचे पत्रही अनेक शाळा व्यवस्थापन समित्यांनी दिलेले नाही. काम केलेल्या दिवसांचे मानधन कसे देणार, याबाबतही कार्यवाही झालेली नाही. अशी वस्तुस्थिती असताना शैक्षणिक संकटात धावून आलेल्या स्थानिकांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असल्याच्या प्रतिक्रिया सध्या स्थानिकांतून उमटत आहेत. आपत्ती किंवा संकटाच्यावेळी स्थानिक आठवतात, मात्र आठ ते दहा दिवसांतच त्यांची सेवा थांबवली जाते, हा चेष्टा केल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. नोकरीवरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू असून किती शिक्षकांना कामावरून कमी केले याबाबतची आकडेवारी जिल्हा परिषदेकडून दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे.