मांडवीसह दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस उद्यापासून डिझेल इंजिनसह धावणार!
विद्युत इंजिनच्या तुटवड्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बदल
रत्नागिरी : विद्युत इंजिनच्या तुटवड्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी, दिवा -सावंतवाडी एक्सप्रेस तसेच सावंतवाडी -मडगाव -सावंतवाडी या सध्या विद्युत इंजिनवर धावत असलेल्या तीन गाड्या पुन्हा एकदा डिझेल इंजिनवर चालवण्याची वेळ रेल्वेवर आली आहे. याची अंमलबजावणी दि 27 मे पासून या गाड्यांच्या डाऊन दिशेच्या फेऱ्यांपासून केली जाणार आहे.
संपूर्ण भारतीय रेल्वे मार्गाचे 2023 पर्यंत विद्युतीकरण करण्याचे धोरण रेल्वेने आखले आहे. त्यानुसार जसजसे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण केले जात आहे त्यानुसार डिझेल इंजिनच्या जागी विद्युत इंजिन जोडून या धोरणाची अंमलबजावणी करणे सुरू आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे देखील विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे आधी या मार्गावरील मालगाड्या विजेवर चालवण्यात आल्या. त्यापाठोपाठ टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या देखील विजेवर चालवल्या जात. या मार्गावर धावणाऱ्या आता केवळ मोजक्याच गाड्या डिझेल इंजिन जोडून धावत आहेत.
दरम्यान, या आधीपासूनच इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालवल्या जाणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव (10103/20104) मांडवी एक्सप्रेस तसेच दिवा सावंतवाडी एक्सप्रेस (10105/10106) तसेच 50107/50108) सावंतवाडी- मडगाव -सावंतवाडी या तीन गाड्या दि. 27 मे 2023 रोजी च्या फेरीपासून इलेक्ट्रिक ऐवजी डिझेल लोको जोडून चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. इलेक्ट्रिक लोकोचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रेल्वेवर ही वेळ आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या दोन एक्सप्रेस गाड्या आता पुन्हा एकदा डिझेल इंजिनसह धावणार आहेत. रेल्वेने हा निर्णय पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात घेतला आहे.