मालवण तालुक्यात धामापूर गावच्या सड्यावर सापडला कातळशिल्पांचा प्राचीन खजिना
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. सद्यस्थितीत सड्यावरील कातळावर दोन ठिकाणी चार कातळशिल्पांच्या चित्रकृती निदर्शनास आल्या असून इतिहास संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे.
मालवण तालुक्यातील धामापूर गाव हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट जंगले, नारळ-पोफळीची झाडे आहेत. दुतर्फा डोंगराच्याच मधोमध वसलेला ऐतिहासिक तलाव ही या गावची वैशिष्ट्य आहेत. तलावाच्या काठावर श्री भगवती देवीचे प्राचीन देवालय आहे. अलीकडेच धामापूर तलावाला ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’चा दर्जा देऊन महाराष्ट्राचा जागतिक सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक आणि प्राचीन पार्श्वभूमीवर असलेल्या धामापूरमध्ये कातळशिल्पांचा खजिना सापडल्याने हेरिटेज टुरिझमसाठी नवे द्वार खुले होणार आहे.
धामापूर, मोगरणे आणि साळेल या तिन्ही गावांच्या लांबलचक सड्यावर ही कातळशिल्पे दिसून आली आहेत. धामापूर गावच्या गोड्याचीवाडीच्या हद्दीत ही कातळशिल्पे आढळून आली आहेत. ‘कातळशिल्पे दोन-चार ठिकाणी आहेत, याबाबत आम्हाला कल्पना आहे. मात्र त्याबद्दल सविस्तर माहिती नाही,’ असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. धामापूर तलाव आणि कातळशिल्पांचा प्राचीन ठेवा पर्यटनदृष्ट्या पर्वणी ठरणारा असून कातळशिल्पाच्या चित्रकृतीचा उलगडा होणे आवश्यक आहे.