मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील आरवली गडनदी पुलाचे काम पूर्णत्वाकडे
रत्नागिरी : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील (NH-66) संगमेश्वर तालुक्याच्या प्रवेशद्वारावर आरवली येथील गडनदी पुलावर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या पूर्व बाजूला उभारलेल्या महामार्गावरील या महत्त्वपूर्ण पुलाचे काम आता अंतिम टप्प्याकडे झुकत आहे. पुलावर गर्डर चढवण्याचे काम पूर्ण झाले असून, दोन्ही बाजूंनी भरावाचे काम अजस्त्र मशिनरी च्या साह्याने युद्धपातळीवर सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टर मधून मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे महामार्गाच्या आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड या पट्ट्यातील रखडलेल्या कामाने वेग घेतला आहे. भल्यामोठ्या व अत्याधुनिक मशिनरीच्या साह्याने डिसेंबर 2023 अखेर मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामापैकी एक मार्गीका पूर्णपणे खुली केली जाणार आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी कामाचा ठेका घेतलेल्या कंपन्यांना हे काम डिसेंबर 2023 अखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील गड नदीवरील पूल हा संगमेश्वर तसेच चिपळूण तालुक्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण पूल आहे. दशक भरापूर्वीच ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती करण्यात येऊन त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. या पुलाच्या बाजूलाच आता चौपदरी महामार्गावरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सद्यस्थितीत गर्डर चढवण्याचे काम पूर्ण झाले असून आरवली बाजारपेठ तसेच चिपळूणमधील खेरशेतच्या बाजूने पुलाला जोडणारा भराव टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर
मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाला आरवली येथे करजुवे -माखजन ते कुंभारखणी – पाचांबे राजीवलीकडे जाणारा रस्ता छेदून जात असल्याने संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे उड्डाणपूल उभारावा लागला आहे. सद्यस्थितीत या पुलाचे थंडावलेले काम देखील वेगाने सुरू आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडचे काम करण्यात आले आहे. सध्या या सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले नसले तरी कशीबशी वाहने जाऊ शकतील इतके काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी आरवली बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या सर्व्हिस रोडला गटाराची व्यवस्था न केल्यास व्यापाऱ्यांना पाणी तुंबण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.