मे.आय.एम.सी.लि. जेएनपीटी, न्हावा शेवा येथे कामगारांच्या वेतनवाढीचा करार

- कोकण श्रमिक संघाच्या माध्यमातून कामगारांना मिळाला न्याय
उरण (विठ्ठल ममताबादे ) : मे.आय.एम.सी.लि., जेएनपीटी, न्हावा शेवा, ता.उरण, जि. रायगड मधील कामगारांच्या वेतनवाढीचा करार शनिवार दि.०६/०९/२०२५ रोजी करण्यात आला.
ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारची रसायने, खाद्यतेले याचा मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठा करीत असते. आवश्यकतेनुसार ग्राहक आपला माल घेऊन जात असतो. यामधून कंपनीला भाडे पोटी मोठा नफा होत असतो. सदर कंपनी मध्ये कोकण श्रमिक संघ ही मान्यता प्राप्त युनियन आहे. कामगारांच्या वेतनवाढीचा मागील करार संपुष्टात आल्यानंतर वेतनवाढीबाबत मागणी पत्र कंपनीला देण्यात आले. नवीन वेतनवाढीचा करारनामाबाबत कामगार नेत्या जनरल सेक्रेटरी ऍड.श्रुती शाम म्हात्रे, सेक्रेटरी- एकनाथ ठोंबरे, स्थानिक युनिट अध्यक्ष रविंद्र भोईर, धर्मेंद्र ठाकुर,रविंद्र ठाकूर, किरण घरत कामगार कमिटी व कंपनीचे अधिकारी हरेष सविता, व्हॉइस प्रेसिडंट सरतेज यादव, जनरल मॅनेजर, नवलेश कुमार रिजनल हेड,नेहरु सुब्रम्हण्यम सि. मॅनेजर फायन्सस, जी. के. श्रीधरन, आय. आर. यांनी वारंवार चर्चा केल्या. चर्चेअंती एकमत झाल्यानंतर दि.०६/०९/२०२५ रोजी सदर वेतनवाढीच्या करारनाम्यावर सह्या करण्यात आल्या.
कंपनीसोबत सलग हा चौथा करार करण्यात संघटनेला यश आले आहे. पाच वर्षे कालावधी करीता कामगारांना एकूण रुपये २१०००/- पगार वाढीचा करार करण्यात संघटना यशस्वी झाली. जेएनपी एरियामध्ये आजपर्यतची हि सर्वात मोठी पगारवाढ कामगारनेत्या डॉ. श्रुती म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली झाली आहे. कामगारांनी जल्लोशात श्रुती म्हात्रे यांचे अभिनंदन केले. खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाने विसर्जना दिवशी कामगारांना मोठी भेट दिली आहे. यामुळे कामगारांमध्ये मोठया प्रमाणात उत्साह पसरला असून कामगारांनी पेढे भरवून आनंद साजरा केला.
सदर वेतनवाढीपोटी कामगारांना मुळ पगार, पर्सनल पे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, धुलाई भत्ता, शैक्षणिक भत्ता याचे फायदे कामगारांना मिळणार आहेत. त्याचबरोबर कुटुंबाकरीता तीन लाखापर्यंत मेडिक्लेम पॉलिसीचे फायदे, रुपये एक लाख रक्कमेचा वैयक्तिक अपघाती विमा याचे फायदे कामगारांना मिळणार आहेत. सदर करारनाम्यामधील कामगारांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.