मडगाव वंदे भारत एक्सप्रेसवर ‘गणपती कृपा’ ;आजपासूनच्या सर्व फेऱ्या हाऊसफुल्ल!

- गाडीला प्रवाशांची वाढती पसंती
- रत्नागिरी, खेडचा आरक्षण कोटा वाढवण्याची मागणी
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती सातत्याने वाढताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात या गाडीला ९५ टक्के इतका प्रतिसाद लाभला. चालू महिन्यात गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असल्याने आजपासूनच्या (दि, ८ सप्टेंबर) या महिन्यातील सर्व डाऊन फेऱ्या हाउसफुल्ल झाल्या आहेत. दिनांक १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव असल्याने १८ सप्टेंबरच्या फेरीच्या आरक्षणाला तर ‘रिग्रेट’ दाखवू लागले आहे.
तिकीट दर अधिक असतानाही स्वदेशी बनावटीच्या या गाडीला प्रवाशांचा मिळणारा हा प्रतिसाद रेल्वेच्या तिजोरीत भर टाकणारा ठरला असून रेल्वेसाठी ही बाब उत्साहवर्धक ठरली आहे.
दिनांक 27 जून 2023 रोजी मडगाव मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चा शुभारंभ झाला. तेव्हापासून या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी कणकवली, थिवी असे थांबे देण्यात आले आहेत.
दि. २७ जून २०२३ रोजी शुभारंभ झाल्यानंतर आधी केवळ क्रेझ म्हणून या गाडीला प्रतिसाद लागत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात वंदे भारत एक्सप्रेसमधील सुविधांचा विचार करता या गाडीचा प्रतिसाद कमी होताना दिसत नाही. रेल्वेला वातानुकूलित गाडी चालवण्यासाठी अपेक्षित असलेली किमान उत्पन्न मर्यादा या गाडीने कधीच ओलांडली आहे. ऑगस्टमधील मुंबई मडगाव या गाडीला (22229) ९५ टक्के इतका प्रवासी प्रतिसाद लागला आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे.
मध्य रेल्वेच्या सर्वच वंदे भारत एक्सप्रेस हाऊसफुल्ल!
गाडीची फेरीनिहाय प्रवासी ऑक्यूपेन्सी प्रमाण
१) 20825 बिलासपूर-नागपूर- १०४%
२) 20826 नागपूर-बिलासपूर- ८६%
३) २२२२५ सीएसएमटी-सोलापूर- ९५%
४) 22226 सोलापूर-सीएसएमटी- ९४%
५) २२२२९ सीएसएमटी-गोवा- ९५%
६) 22223 सीएसएमटी-शिर्डी- ८०%
७) २२२२४ शिर्डी-सीएसएमटी- ७८%