मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीला आदर्श पत्रकार संघ पुरस्कार जाहीर
मराठी पत्रकार परिषदेकडून रंगा अण्णा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या रंगा आण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी येथे ही घोषणा केली.
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुका आणि जिल्हा संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा आण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आदर्श तालुका पत्रकार संघाची घोषणा या पूर्वीच करण्यात आली आहे. आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेला जाहीर करण्यात आला आहे. येत्या ७ एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होणाऱ्या सोहळ्यात राज्यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या जिल्हा आणि तालुका संघांना सन्मानित करण्यात येणार आहे.