अष्टपैलू व्यक्तिमत्व : उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री. रामेश्वर बावनकर

रा रागीट आणि कणखर जरी बाहेरून दिसले प्रशासन चालवताना तरी हृदयात त्यांच्या आहे भावनिकतेचा, आपुलकीचा, माणुसकीचा जिवंत झरा…
मे मेहेरबानी नको कोणाची, धमक आहे अन्यायाला वाचा फोडण्याची, यंत्रणेला जाब विचारण्याची… प्रसंगी संघर्षाचीही!
श्व श्वसनाचा शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत सत्याच्या वाटेने चालायचे.
र रहायचे सदा स्वतःशीच प्रामाणिक आणि वेळप्रसंगी कठोरही. करायची मदत दुसऱ्याला जोपर्यंत होईल शक्य.
बा बावन्न नव्हे छप्पन्न इंचापेक्षाही जास्त छाती फुगते त्यांची, जेव्हा आपले विद्यार्थी यश मिळवतात तेव्हा…
व वजीर आणि किंगमेकर ठरतात शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सहकारी शिक्षकांसाठीही.
न नकारघंटा कधी लावायची नाही. सकारात्मक राहून शाळा चालवताना घेतात सगळ्यांचे ऐकून आणि निर्णय घेतात कायद्याच्या चौकटीत राहून.
क ‘करूया प्रामाणिक कष्ट, मिळवूया यश’, ‘नको यशाचे शॉर्टकट्स’ हीच त्यांची शिकवण.
र रचला शैक्षणिक कारकिर्दीत इतिहास आणि भजेपारसारख्या अनेक शाळांचे नाव पोहोचवले जिल्हाभरात…

जीवन परिचय
1) नाव : श्री. रामेश्वर श्रीराम बावनकर
2) जन्मतारीख : 21/01/1968
3) पत्ता : नेहरूवॉर्ड, जुनीवस्ती, ता. तिरोडा, जिल्हा- गोंदिया
4) सुरू नोकरीची तारीख 8/3/1991
4) शिक्षण : एम. ए. बीएड.
5) छंद : सुंदर हस्ताक्षरात लेखन, योगा, प्राणायाम, वर्तमानपत्र वाचन, सामान्यज्ञानाचे वाचन.
6) शैक्षणिक उल्लेखनीय कामगिरी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता, गुणवत्ता वाढीसाठी, शालेय शिस्तीसाठी प्रयत्नशील.
माझ्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात ज्या मुख्याध्यापकांपासून झाली ते आमचे आधारवड, मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री. रामेश्वर बावनकर सर जानेवारी 2026 मध्ये सेवानिवृत्त होत आहेत, ही भावना मनाला दुःख देणारी आहे. निरोप समारंभापूर्वी सरांना गुरुदक्षिणा द्यावी, असा संकल्प आम्हा शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांनी केला होता. ‘याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा’… या तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळी कायमच आम्हाला ऊर्जा द्यायच्या. सांस्कृतिक स्पर्धेत एकदातरी तालुका जिंकायचाच असा निर्धार केला, आणि त्यानुसार प्रयत्नही सुरू झाले. बघता बघता विद्यार्थी मेहनत घेऊ लागले. सलग 2 वर्ष केंद्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत भजेपार शाळा चॅम्पियन झाली. 2 वर्ष तालुक्यातील शाळांशी स्पर्धा केली. 2025-2026 या शैक्षणिक वर्षात तर केंद्र जिंकत तालुक्यातील समूह नृत्यात व लेझीम नृत्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर जिल्हा स्तरावरचे मैदान आमच्या शाळेने गाजवले. तालुका जिंकून ही विजयाची गिफ्ट तुम्हाला अर्पण करताना आम्हाला खूप आनंद होतोय, आणि समाधानही. नोकरीतील शेवटची दोन वर्षे तुम्ही भजेपार शाळेत राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धांमध्ये मिळवलेले यश याच्या आठवणी नक्कीच तुम्हाला नोकरीनंतरच्या आयुष्यात आनंद देतील. तुमच्या शैक्षणिक नोकरीच्या आयुष्यातील हा शेवटचा क्षण यादगार व्हावा, यासाठी शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि पालकांनीही सहकार्य केले.
खरं तर जेव्हा कोकणातील घरापासून हजार-दीड हजार किलोमीटर दूर अंतरावर नोकरी करण्यासाठी आम्ही विदर्भात आलो, तेव्हा तुमच्यासारखे निर्भीड, निस्वार्थी, प्रामाणिक, अष्टपैलू, कलाप्रेमी, विद्यार्थ्यांशी बांधिलकी, प्रगल्भ आणि प्रतिष्ठित विचारधारा असणारा, अभ्यासू, उत्तम प्रशासक, सहकार्यवृत्ती आणि प्रसंगी वडिलधाऱ्यांसारखा आधार देणारे मुख्याध्यापक मिळाले तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने जिंकलो. आमच्यातील कलागुणांना तुम्ही हेरलात. आमच्यातील कौशल्य, आणि ‘आम्ही काय करू शकतो’ हे तुम्ही अचूक ओळखलात, आम्हाला व्यासपीठ दिलेत, हेच आमचे सुदैव. समोरच्याला पारखण्याची ताकद तुमच्याकडे आहे; जे आदर्श प्रशासकाचे वैशिष्ट्य आहे. ‘तुम्ही हे करू शकता’, या तुमच्या विश्वासानेच आम्हाला ‘काहीतरी करून दाखवायचेच’ याची प्रेरणा मिळायची. भजेपारची शाळा, भजेपारचे विद्यार्थी यांच्या गुणवत्तेसाठी झटताना आपोआपच या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाला, असे येथील पालक, ग्रामस्थ आता सांगू लागले आहेत आणि भविष्यातही सांगतील.
या माझ्या नोकरीच्या प्रवासात सदैव आमच्या पाठीवर राहिला तो तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. भजेपार गावाच्या इतिहासात नोंद व्हावी, अशी ऐतिहासिक कामगिरी तुमच्या कारकिर्दीत घडली. कौतुकास्पद ठरतील असे वेगवेगळे उपक्रम राबविले, तालुका व जिल्ह्याला स्पर्धा केली. यापूर्वी कधी झाले नाही असे सांस्कृतिक कार्यक्रम 2 वर्षे शाळेत झाले, अशा आठवणी भजेपारचे विद्यार्थी भविष्यात सांगतील आणि आताही सांगतात. हे सगळे शक्य झाले ते बावनकर सर तुमच्या प्रेरणेमुळे आणि पुढाकाराने. काहीतरी करायची इच्छा असली की नागझिरा जंगलाच्या पायथ्याशी असणाऱ्या एका गावातील शाळा देखील नेत्रदीपक प्रगती करू शकते, हे तुम्ही दाखवून दिलेत. एक मुख्याध्यापक प्रेरणादायी असेल, सकारात्मक असेल, हार न मानता आव्हानांशी झुंजणारा असेल तर शिक्षकांना, विद्यार्थ्यांनाही त्यातून लढण्याची ऊर्जा मिळते, स्पर्धा करण्याचे बळ मिळते आणि तेही मैदान गाजवतात हे ‘याचि देही याचि डोळा’ तिरोडा तालुक्याने अनुभवले ते 2 वर्षांच्या अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात.
आमच्यासारख्या नवीन जनरेशनमधील शिक्षकांवर तुम्ही विश्वास टाकलात, तेव्हाच खऱ्या अर्थाने लढायचे बळ मिळाले. तिथेच खऱ्या अर्थाने शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळं नवीन करण्याची ईर्ष्या निर्माण झाली. शाळेबाबत निर्णय घेताना सहकारी शिक्षकांना विश्वासात घेतले पाहिजे, ही तुमची विचारधारा. खरं तर आम्ही नवीन शिक्षण सेवक म्हणजे तुमच्या मुला-मुलींच्या वयाचे. आता, आम्ही तुम्हाला काय सांगणार? असे कधीकधी आम्हाला वाटायचे. पण शाळेच्या बाबतीत निर्णय घेताना कायमच आम्हा शिक्षकांना तुम्ही विचारात घेतलेत. समोरचा चुकत असेल तर त्याला एक-दोन वेळा संधी द्यायची. अगदीच जर का हाताबाहेर जात असेल तर त्याचे वेळीच कान टोचायचे, हेच तुमच्या प्रशासकीय यशाचे गमक. आम्ही कधी शाळेची शिस्त मोडली नाही किंवा आम्ही कधी तुमच्या स्वभावाचा गैरफायदाही घेतला नाही.
किंबहुना आमच्या चुकीला तुम्ही कधी पाठिशी घातलेत नाही. चूक ते चूकच. शाळेसाठी नवीन काहीतरी करताना आमच्यापुढे कायम एक पाऊल पुढे राहिलात.
दुसऱ्याला मोठे करताना आपणही अप्रत्यक्षपणे मोठे होत असतो, हे तुमच्याकडून शिकायला मिळाले.
‘नवीन कोण काही करणारा असेल की त्याचे पंख छाटायचे, त्याला जाणूनबुजून अडचणीत आणायचे, आपणही काही करायचे नाही आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचे नाही’ अशी वृत्ती एका बाजूने सगळ्याच नोकरींच्या क्षेत्रात वाढत असताना तुम्ही मात्र आम्हाला सदैव चांगली आणि आदराची वागणूक दिलीत. प्रशासन चालवण्यासाठी जे चांगले गुण लागतात ते तुमच्यात अंगिभूत आहेत, याची प्रचिती आम्हाला नोकरी करताना आली. विशेष म्हणजे एखादा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही समोरच्याला विचारात घेता. त्याचे आदराने ऐकून घेता. एखाद्याच्या विरोधकांनी कितीही कान भरले तरी प्रत्यक्ष वस्तुस्थितीची खात्री करून स्वतःचे मत बनवता असे आणि यासारखे कितीतरी गुण तुमच्या यशस्वी प्रशासकीय कामाची ओळख सांगतात.
या नोकरीच्या प्रवासात अनेकांनी आपल्यावर टीकाटिप्पणी केली. खोटेनाटे सांगून वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. अफवा पसरवण्यात आल्या. परंतु या सगळ्यात शाळा व विद्यार्थ्यांशी असलेला प्रामाणिकपणा, कामाप्रति असलेली निष्ठाच जिंकली. चांगले काम करायला गेले की विरोधक निर्माण होतातच. त्यांना चांगल्या कामाने उत्तर द्यायचे, ही तुमची शिकवण सदैव लक्षात राहील. ‘राजकारण करता आले नाही तरी चालेल, पण ते ओळखता आले पाहिजे. राजकारण करायचेच असेल तर बेरजेचे राजकारण करा, शह-काटशहाचे राजकारण शाळा चालवताना करू नका’ ही तुमच्या प्रशासकीय कौशल्याची खरी ओळख. मुख्याध्यापकांची मर्जी राखण्यासाठी मागे मागे करायचे, हे आम्हाला कधी जमले नाही. किंबहुना तुम्ही अशा प्रवृत्तींना कधी पाठिंबा दिला नाहीत. ‘शाळेसाठी काम करा, आणि शाबासकी मिळवा’, या भावनेने तुम्ही शिक्षकांसोबत कार्यरत राहिलात. शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधताना विद्यार्थ्यांचे, शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी तुमची कायम धडपड असायची. विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण केलेला आदर, हाच तुम्हाला मिळालेला ‘आदर्श पुरस्कार’!
शाळेतील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती समजून घेऊन त्यांना तुम्ही पाठबळ देत होता. त्यांची हुशारी, कौशल्य पाहून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात दिशा देण्याचे कार्य तुमच्याकडून घडले. मुलांबरोबर केवळ अभ्यासातच नव्हे तर त्यांच्या इतर गुणांमध्ये रमताना त्यांच्याशी समरस होऊन जवळीक साधून मुलांच्या कलाने त्यांना यशस्वी कसे व्हायचे, हे शिकवलेत. खरं तर इंग्रजी हा तुमचा शिक्षणातील पदवीचा विषय. पण गणित हा विषय तुम्हाला शिकवायला जास्त आवडायचा. विद्यार्थ्यांनाही तुम्ही शिकवलेले गणित चांगले समजायचे. ज्याला गणित चांगले जमले, त्याच्या ‘आयुष्याचेही गणित’ कधी चुकत नाही, हे तुम्ही दाखवून दिलेत. आपल्या अवतीभवती काय सुरू आहे, याच्या अपडेट विद्यार्थ्यांना मिळायला हव्यात, यासाठी जनरल नॉलेजवर तुमचा भर असायचा. परिपाठाला बसल्याबसल्या सहजपणे सर्व विद्यार्थ्यांना चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज यांचा वस्तुपाठ मिळायचा. भाषा, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र यापासून सुरू झालेला हा मार्गदर्शनाचा धडा गणित, विज्ञानापर्यंत पोहोचायचा. विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखनासह इंग्रजीच्या विकासासाठी तुमचे असलेले प्रयत्न म्हणजे एक आदर्शच होता. लेझिम हातात घेऊन विद्यार्थ्यांसमोर ताल धरलात की त्यांनाही ऊर्जा मिळायची. खो-खो, कबड्डीच्या मैदानावर विद्यार्थ्यांना धडे देताना तल्लीन व्हायचात. सांस्कृतिक कार्यक्रमातही विद्यार्थ्यांसोबत ठेका धरत होता. नोकरीच्या अखेरच्या दिवसापर्यंत शेवटचा प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने जगून घेत होता, हे पाहताना आम्हालाही समाधान वाटत होते. नोकरीचे शेवटचे दिवस जसे जवळ येत होते, तसे तुम्हीही शेवटी शेवटी भावनिक होत होता. हे शेवटचे दिवस एन्जॉय करण्यासाठी तुमचे असलेले प्रयत्न पाहून आम्हालाही भरून यायचं. सेवानिवृत्ती जवळ आली, तेव्हा आपसुकच पावले जड झाली. जुन्या आठवणी डोळ्यासमोर तरळू लागल्या. आयुष्याचा लेखाजोखा उलगडू लागला. उरलेला प्रत्येक क्षण विद्यार्थ्यांसोबत शाळेत एन्जॉय करायचा असे तुम्ही ठरवलेत. शेवटी कधीतरी प्रत्येकाला वेळेनुसार कुठेतरी थांबावे लागते, हा निसर्गचक्राचा नियमच आहे; तो आपल्याला तरी कसा चुकणार! नोकरी करताना आयुष्यभर वाघासारखे निर्भीडपणे जगलात; पण अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या कठोरतेचा रंगही थोडासा बदलल्यासारखा वाटतो, तशी तुमच्या वागण्यातील कठोरताही थोडी मृदू झाली.
बघता बघता जवळ आली निवृत्ती…छे, छे… ही निवृत्ती नव्हे, आता तर सुरू होणार आहे जगण्याची नवी आवृत्ती. शाळेची वेळ पाळण्यासाठी जसे 100 च्या स्पीडने शाळेत येत होता, तशी या नवीन इनिंगसाठी पुन्हा एकदा नव्याने भरारी घ्या… आता नको ती घड्याळाची टिकटिक, नको कामाचा ताण, सेवा निवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम छान… तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.
–भाग्यश्री रेवडेकर, शिक्षिका-जि. प. शाळा भजेपार.





