‘आयआरटीएस’ अधिकारी सुनील गुप्ता कोकण रेल्वेच्या संचालकपदी

मुंबई : सरकारने सुनील गुप्ता यांची रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रम कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक (ऑपरेशन्स अँड कमर्शियल) पदावर नियुक्ती केली आहे.
१९९८ व्या बॅचचे वरिष्ठ आयआरटीएस अधिकारी सुनील गुप्ता हे जयपूर येथील उत्तर पश्चिम रेल्वे मुख्यालयात मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. ते पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही भूमिका बजावतील.
कॅबिनेटच्या नियुक्ती समिती (एसीसी) आणि रेल्वे मंत्र्यांनी या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
सुनील गुप्ता यांना भारतीय रेल्वेवर ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटचे व्यवस्थापन करण्याचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांना रेल्वे विभाग आणि मुख्यालयात काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या ऑपरेशन्स अँड बिझनेस डेव्हलपमेंटचे राजस्थान प्रमुख म्हणून काम करताना त्यांना कंटेनर व्यवसाय हाताळण्याचा अनुभव आहे. त्यांनी INSEAD सिंगापूर, ICLIF, क्वालालंपूर, मलेशिया, साउथ वेस्ट जिओटोंग युनिव्हर्सिटी, चेंगडू, चीन आणि अँटवर्प पोर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बेल्जियम यासह विविध प्रशिक्षणे घेतली आहेत.