आषाढी एकादशी-२०२३ करिता पथकर सवलत प्रवेशपत्रासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
अलिबाग : शासनातर्फे दि.१३ जून ते दि. ०३ जुलै २०२३ या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच पथकरातून सूट देण्यासाठी आषाढी एकादशी २०२३ करिता पथकर सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. ही सवलत पास/स्टीकर्स दि.१३ जून ते दि.०३ जुलै २०२३ पर्यंत वेळ सकाळी ९.०० ते रात्री १०.०० या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पथकर सवलत पासेस देण्याकरिता या कार्यालयात विशेष कक्ष निर्माण करण्यात आला असून महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे रस्ते (उदा. मुंबई मधील सायन ते पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई- बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा- कोल्हापूर ते राज्य सिमेपर्यंतचा महामार्ग इ. महामार्ग तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-पुणे-सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे नवीन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते इ.) मार्गावर पथकर सवलत देण्यात आली आहे.
पथकर सवलत प्रवेशपत्रासाठी संबंधित वाहन मालकाने या कार्यालयात पथकर सवलत मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असून अर्जासोबत वाहनाचे वैध कागदपत्रांच्या (उदा. आर.सी, पीयूसी, इंश्युरन्स, फिटनेस, परवाना) छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अशा परिपूर्ण अर्जदारांना या कार्यालयामार्फत आषाढी एकादशी २०२३ करिता पथकर सवलत प्रवेशपत्र (Toll Free Pass) वितरित करण्यात येत आहेत.
रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे.