उघड्यावरील अन्न खाल्ल्याने ५ मुलांना विषबाधा

उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ) : दिघोडे बस स्थानका जवळील उघड्यावर विकला जाणारा सुरमा हा खाद्यपदार्थ मुलांनी खाल्ल्यानंतर ५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी ( दि.२९) घडली आहे. त्यामुळे या मुलांच्या पोटात दुखायला लागले व उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवि क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विषबाधा झालेली मुले ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे तेथील डॉ. प्रकाश मेहता यांनी सदर मुलांवर उपचार सुरू केले. ही विषबाधा ही सुरमा हा खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे झाला असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने उरण तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याने आज शहरात व तालुक्यातील अनेक गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरिक विक्री करत आहेत. त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या,पोटात दुखण्याची कारणे समोर येत आहेत. त्यातच शनिवारी ( दि. २९) दिघोडे बस स्थानका जवळील रस्त्यावर विकला जाणारा सुरमा हा खाद्यपदार्थ शुभम पाटील, शुभम ठाकूर,निशांत भगत,रोहन पाटील व एक लहान मुलगा यांनी खाल्ल्याने त्यांना पोटात दुखायला लागले तसेच उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवि क्लिनिक रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.रुग्णालयातील डॉ प्रकाश मेहता यांनी या रुग्णांवर उपचार सुरू केले. परंतु आज डॉ. प्रकाश मेहता यांच्या तत्परतेने सदर रुग्णांचे प्राण वाचले आहे.
या घटनेतील रुग्णांनी उघड्यावरील सुरमा हा अन्न पदार्थ खाल्ल्याने त्यांना फुड पँयजन ( अन्नातून विषबाधा) झाले आहे.त्याची प्रकूती चांगली आहे.तरी नागरीकांनी विशेष करून लहान मुलांनी उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत
–डॉ प्रकाश मेहता.
दरम्यान, या घटनेपासून बोध घेऊन आता तरी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उघड्यावरील विक्री करणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.