उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी १७ खासदारांना ‘संसद रत्न पुरस्कार २०२५’ प्रदान!

नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे शनिवारी १७ खासदारांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी प्रतिष्ठित ‘संसद रत्न पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आले. एका बिगर-सरकारी संस्थेने आयोजित केलेल्या या सोहळ्यात विविध पक्षांच्या खासदारांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार विजेत्यांमध्ये भाजपचे खासदार रवी किशन आणि दिनेश शर्मा, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांचा समावेश आहे.
याप्रसंगी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “हा पुरस्कार खासदारांच्या अतुलनीय कामगिरीची ओळख आहे.” त्यांनी पुरस्कार प्राप्त सर्व खासदारांचे अभिनंदनही केले.
‘संसद रत्न पुरस्कार’ म्हणजे काय?
‘संसद रत्न पुरस्कार’ हा खासदारांनी संसदेतील कामकाजात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. प्रश्न विचारणे, चर्चांमध्ये सहभाग घेणे, कायदेविषयक योगदान देणे आणि संसदीय समित्यांमधील काम यांसारख्या विविध निकषांवर खासदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने २०१० पासून चेन्नईस्थित ‘प्राइम पॉईंट फाउंडेशन’ आणि ‘ई-मॅगझिन’ यांच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात.
या पुरस्कारामुळे लोकशाहीच्या मंदिरात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रोत्साहन मिळते आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते.