उद्धव ठाकरेंच्या सभेला उत्तर देणारी मुख्यमंत्री शिंदे यांची १९ मार्चला खेडमध्ये सभा
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी सायंकाळी खेडमध्ये शिवगर्जना सभा झाल्यानंतर या सभेमध्ये करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिनांक 19 मार्च 2023 रोजी सभा खेडमध्येच घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सभेत रविवारच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
खेडमध्ये रविवारी सायंकाळी महाड नाका येथील गोळीबार मैदानात जाहीर सभा घेण्यात आली. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, माजी खासदार अनंत गीते, गुहागरचे आमदार भास्कर जाधव आदी नेत्यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्याची तयारी सत्ताधारी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
रविवारी ठाकरे यांची खेडमध्ये बैठक झाल्यानंतर येत्या 19 मार्चला खेडमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेणार असल्याच्या वृत्ताला राज्याचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी सोमवारी ट्विटर संदेशाद्वारे दुजोरा दिला आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार असलेले राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे १९ मार्चला खेड (रत्नागिरी) मध्ये शिवसेनेची जाहीरसभा घेऊन लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर देतील. कितीही आदळआपट करा, योगेश कदमच आमदार होतील. –उदय सामंत, पालकमंत्री, रत्नागिरी.