उद्योगमंत्री उदय सामंत यांना डीवाय पाटील विद्यापीठाची डॉक्टरेट
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20241015-WA0001-780x470.jpg)
- सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाबद्दल सन्मान होणार
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाच्या गव्हर्निंग बोर्ड आणि व्यवस्थापन मंडळाने डॉक्टर ऑफ लेटर्स – Honoris Causa (D.Ltt.) ही पदवी मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांना जाहीर केली आहे. नुकतेच तसे पत्र ना. उदय सामंत यांना प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या ९ व्या दीक्षांत समारंभात ही पदवी ना. सामंत यांना प्रदान केली जाणार आहे. हा समारंभ लोहेगाव, पुणे, भारत मार्गे चर्होली बीके येथील अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शनिवारी, १ फेब्रुवारी, २०२५ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
उदय सामंत यांच्या नेतृत्वामुळे शिक्षण, रोजगार, ग्रामीण विकास, आणि कोकणातील प्रकल्पांना प्राधान्य मिळाले आहे. त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठ्या ताकदीने आपली ओळख निर्माण केली असून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघातील जनतेचा विश्वास कायम ठेवला आहे. उदय सामंत यांचे सामाजिक योगदान त्यांच्या राजकीय कारकिर्दीइतकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी, सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी, आणि लोकशाही प्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध प्रकारे काम केले आहे.
उदय सामंत यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानही महत्त्वपूर्ण आहे. ते समाजातील विविध संस्कृतींचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सक्रिय आहेत. कोकणातील स्थानिक वारसा आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे.त्यांच्या या व अन्य सामाजिक सांस्कृतिक, राजकीय कामांची दखल घेऊन त्यांना ही पदवी प्रदान केली जाणार आहे.