उरणमधील रेल्वे स्थानकांच्या नामांतर प्रकरणी स्थानिक भूमिपुत्रांसह सामाजिक संस्थांचा आंदोलनाचा इशारा
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : उरणमधील रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्यासाठी उरणमधील ग्रामस्थांनी, विविध सामाजिक संघटनानी रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार करूनही हा प्रश्न प्रलंबितच राहत आहे. तसेच रेल्वे सुरु होण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. उरणमधील रेल्वे स्थानकांचा नामांतरचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे विविध सामाजिक संस्था, संघटना व स्थानिक भूमिपुत्रांनी महाराष्ट्र शासन व रेल्वे प्रशासनालाbआंदोलनाचा इशारा दिला आहे.
खारकोपर ते उरण दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील स्थानकांना येथील स्थानिक महसुली गावांची नावे द्यावी, या मागणीसाठी भूमिपुत्रांनी रेल्वेच्या उद्घाटनाच्या वेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांच्या नावांबाबतचे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
नेरुळ ते उरण या मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर पुढील पाचही स्थानकांच्या नावात बदल आणि नामविस्ताराच्या मागणीसाठी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. खारकोपर ते उरण या रेल्वेच्या मार्गावर पाच स्थानके आहेत. यातील गव्हाण हे रेल्वे स्थानक गव्हाण आणि जासई या दोन महसुली गावांच्या हद्दीत येत आहेत. मात्र, या स्थानकाला गव्हाण नाव देण्यात आल्याने जासई नाव देण्याची मागणी आहे. त्यानंतर येणारे रांजणपाडा हे धुतुम गावाच्या महसूल हद्दीत आहे. तर न्हावा- शेवा हे स्थानक नवघर हद्दीत आहे. त्याचप्रमाणे द्रोणागिरी स्थानक बोकडवीरा गावाच्या हद्दीत तर उरण हे कोटनाका (काळाधोंडा) या महसूल हद्दीत आहे. त्यामुळे उरण- कोट, बोकडवीरा- द्रोणागिरी, नवघर-न्हावा शेवा, रांजणपाडा- धुतुम व गव्हाण जासई अशी स्थानिक गावांची नावे देण्याची मागणी करण्यात येत आहे.
यासंदर्भात सिडकोने संचालक मंडळात ठराव करून राज्य सरकारला पाठविण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण होणार का की भूमिपुत्रांची आश्वासनावर बोळवण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण यापूर्वी ही सिडकोने येथील बोकडवीरा, जासई व नवघर येथील ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे.
नवी मुंबईचा भाग म्हणून सिडकोच्या माध्यमातून उरणचा विकास केला जात असताना सिडकोने १९९७ ला रेल्वे मार्गही निश्चित केला. मात्र हा मार्ग सुचविताना येथील स्थानकांची नावे देताना भूमिपुत्र गावांना विश्वासात न घेता त्यांना डावलून ही नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
उद्घाटनाच्या तारखेच्या बाबतीत अनिश्चितता
सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर वर्षभरापासून वाहतुकीसाठी सज्ज असलेल्या उरण ते खारकोपर रेल्वे मार्गाच्या उदघाटनाच्या तारीख पे तारीख येत असल्याने या बहुप्रतीक्षित मार्गाच्या उद्घाटन विषयी नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.केंद्र सरकार कडून तारीख पे तारीख मिळत असल्याने उरण मधील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नामांतरसाठी बैठकांचे आयोजन
नवी मुंबईतील पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान उरण ते खारकोपर मार्गाच्या उद्घाटनाची जोरदार चर्चा झाल्यानंतर पावसाळ्यापूर्वी नामांतरासाठी केलेल्या आंदोलनानंतर नवघर व धुतुम येथील ग्रामस्थांनी उरण पोलिसांना नामांतराच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचे पत्र दिले आहे. तर बोकडवीरा ग्रामस्थांनी जनरल सभा आयोजित करून मागणी केली आहे. तसेच उरणला वेळेत रेल्वे सुरु होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.या विविध समस्या सोडविण्यासाठी गावा गावात गाव बैठकाही होत आहेत.
राज्य सरकारकडून प्रस्ताव जाण्याची गरज
येथील भूमिपुत्रांच्या अस्मितेसाठी उरण ते खारकोपर मार्गावरील स्थानकांना महसुली गावांची नावे देण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्यासाठी राज्य सरकारकडून या नावांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राला पाठविणे आवश्यक असते ही प्रकिया झाली आहे का असा सवाल स्थानिक भूमीपुत्रांनी, विविध सामाजिक संस्थांनी उपस्थित केला आहे.
स्थानकनिहाय नावांची मागणी
गव्हाण – जासई
उरण – कोट
बोकडवीरा- द्रोणागिरी
न्हावा शेवा – नवघर
रांजणपाडा – धुतूम