उरणमध्ये बांधकाम साईटवरून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक

- उरण तालुका मराठी पत्रकार संघाने यापूर्वीच केली होती मागणी
उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : भारत देशात बांगलादेशी घुसखोरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे देशाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत. उरणचा ही औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने परप्रांतीयांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरी संवेदनशील बनलेल्या उरण शहर व तालुक्याच्यास सुरक्षेसाठी परप्रांतीय नागरिकांचे व्हेरीफिकेशन करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर उरण पोलिसांनी द्रोणागिरी नोडमधील गामी ग्रुप या विकासकाची बांधकाम साईटवरील कामगार बांगलादेशी असल्याचे उघड झाले आहे.
आजच्या घडीला उरण परिसरात बेसुमार बांगलादेशी असून त्या सर्वांची तपासणी केली तर नक्कीच बांगलादेशीयांचे पितळ उघडे पडेल.
उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. द्रोणागिरी नोड सारख्या अनेक छोट्यामोठ्या रहिवाशांच्या वस्त्या उभ्या रहात आहेत. तसेच उरण तालुक्याची भौगोलिक स्थिती पाहता तालुक्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या किनाऱ्याच्या माध्यमातून येथील भागात औद्योगिक विकास देखील झापाट्याने होत आहे. नौदालाचे शस्त्रागार, तेल व नैसर्गिक वायू शुद्धीकरण प्रकल्प (ONGC), देशातील सर्वात मोठे जवाहारलाल नेहरू बंदर प्राधिकरण, गॅस आधारीत वीज प्रकल्प (GTPS), तेल साठवणूक प्रकल्प, भारत पेट्रोलिम सारखा गॅस वितरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तर JNPA बंदरावर आधारीत शेकडो कंटेनर यार्ड, फ्रेट स्टेशन या तालुक्यात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे उरण तालुका अतिसंवेदनशील प्रकल्प बनला आहे. त्यात उरण रेल्वे सुरू झाल्याने परप्रांतीयांना पळण्यासाठी सोयीचा मार्ग ठरू शकतो.
सुरक्षेच्या दृष्टीने तालुक्यातील कानाकोपऱ्यावर करडी नजर असणे गरजेचे आहे. मात्र सध्या प्रत्येक गावात तसेच शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांची घुसखोरी होताना दिसत आहे. ज्यांमध्ये बंगलादेशी, रोहिंग्या तसेच देश विघाटक घटनांना चालना देणारे नागरिक मोठ्या प्रमाणात असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. अशा विनापरवाना घुसखोरी करून, संवेदनशील उरण तालुक्याला धोकेदायक ठरणाऱ्या वरील नागरिकांपासुन सुरक्षित रहाण्यासाठी अशा नागरिकांचे आणि त्यांच्याकडील दस्ताऐवजाची तपासणी होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम येथील जनतेला सहन करावे लागतील.
यासाठी मुळेखंड, करंजा येथील शक्करपीर दर्ग्याजवळ तयार झालेली नवी वसाहत, डाऊरनगर येथील भाडेतात्वावर रहाणारे परप्रांतीय, चारफाटा येथे सकाळी जमा होणारे मंजूर, तालुक्यातील तसेच शहरांतील रस्त्यावर फिरणारे फेरीवाले, परप्रांतीय कुरिअर बॉय, बोरी स्मशानभूमी येथील अवैद्य वस्ती, भवरा येथील परप्रांतीयांची वस्ती, गावागावातील परप्रांतीय भाडोत्री या सर्वांच्या कागदपत्रांसह त्यांची सखोल चौकशी केली तर नक्कीच बांगलादेशी घोटाळा उघड होईल. मतांसाठी राजकीय पक्ष व त्यांचे नेतेमंडळी मौनव्रत धारण करून बसली आहेत.
उरण द्रोणागिरी नोड येथे गामी ग्रुप या विकासकाची बांधकाम साईट सुरु आहे. या साईटवरील संबंधित लेबर ठेकेदाराने आपल्या कामावर काही बांगलादेशी कामगार कामावर ठेवले असल्याची गुप्त माहिती उरण पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार उरण पोलीसांनी मंगळवारी सापळा रचून सदर बांधकाम साईटवर काम करीत असलेल्या कामगारांची तपासणी केली असता ७ बांगलादेशी पुरुष आढळून आले. या घुसखोराकडून आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर येत असून अधिक तपास उरण पोलीस करत आहेत.
उरण शहरात मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंटची कामे सुरु आहेत. त्यामुळे इथं कामगारांची मोठी मागणी आहे. मागील वर्षीदेखील नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत केलेल्या शोधमोहिमेत अनेक बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती, असे सूत्रांनी सांगितले. फेरीवाला, मजूर काम, घरातील धुणीभांडी, लेडीज सर्व्हिस बार अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही मंडळी काम करत असल्याचे पोलिसांना आढळले आहे.
या संदर्भात लवकरात लवकर उरण शहर व तालुक्यातील संबंधित पोलीस ठाणे, तहसीलदार, कंपनी प्रशासनाचे प्रमुख अधिकारी वर्ग, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आदींची सयुक्त बैठक चर्चासत्र घेण्यात यावे. तसेच उरणमधील प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून उरण व उरणकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठेवण्यात आलेल्या सर्व भाडेकरूंची कागदोपत्री तपासणी तातडीने करून त्याची माहिती पोलीस यंत्रणेला लेखी स्वरूपात द्यावी. त्यानंतर शहरात व तालुक्यात कोंबिंग ऑपरेशन करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने यापूर्वीच खेळू होती, परंतु याची दखल घेऊन जरी कारवाई करण्यात आली असली तरी आजच्या घडीला ठोस कोंबिंग ऑपरेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.