महाराष्ट्रराजकीयलोकल न्यूजहेल्थ कॉर्नर

कातभट्टीमुळे दूषित पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत सावर्डे ग्रामस्थांच्या पाठीशी : नीलेश राणे

  • सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना निलेश राणे यांनी दिली ग्वाही
  • कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्याची केली पाहणी

चिपळूण :  कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली, असा सवाल भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना केला. तर येथील ग्रामस्थ दडपणाखाली असल्याचे जाणवत असून १२ वर्षे काळे पाणी प्यावं लागतं, ही दुर्दैवी बाब आहे. यामुळे येथील ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध पाणी मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही ग्रामस्थ व पत्रकारांशी बोलतांना राणे यांनी दिली.

सावर्डे येथील कातभट्टीचा त्रास येथील स्थानिक ग्रामस्थांना होत आहे. गेले काही दिवस कातभट्टीचे पाणी थेट येथील नदीत जात असल्याने येथील नदी पूर्णपणे प्रदूषित झाली असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. तसेच येथील विहिरी व बोरवेलला देखील लाल भडक प्रदूषित पाणी येत असून तेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. गेले कित्येक वर्ष हा त्रास स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात अनेकवेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार देखील ग्रामस्थांनी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असा ग्रामस्थांनी आरोप करीत आता आवाज उठवला आहे.

सावर्डे येथील दूषित पाणी

याची भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी तात्काळ दखल घेत शुक्रवारी सावर्डे भुवडवाडी येथील पऱ्यातून वाहत असलेल्या कातभट्टीतील प्रदूषित सांडपाण्याची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी प्रश्नांची सरबत्ती करून अधिकाऱ्यांना भांडावून सोडले. तुम्ही संबंधितांवर कारवाई कधी करणार? असा सवाल विचारला. तर आता आपण स्वतः पाण्याचे नमुने घेऊन जाणार असल्याचे सांगितले. विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे, हा विषय तिथपर्यंत पोहोचवणार असल्याचे अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले.

सावर्डे भुवडवाडी येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असताना तहसीलदार व प्रांत जागेवर नाहीत, त्यांना पहिलं जागेवर आणावे लागेल. त्यांना जागेवर आणलं की त्यांच्याकडून जे रिपोर्ट जाणार आहेत. त्याबाबत विचारू आणि हा विषय येत्या आठवड्याभरात मोकळा करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

नीलेश राणे, माजी खासदार, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ.

या संदर्भात  सावर्डे- भुवडवाडीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांनी भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांना निवेदन दिले. तर मार्गदर्शन करतांना व पत्रकारांशी बोलतांना राणे यावेळी म्हणाले की, सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थ १२ वर्षे काळे पाणी प्यावे लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थ दडपणाखाली आहेत. येथील ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध पाणी मिळावे, आरोग्य नीट रहावे, यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. गोरगरीब जनता दडपणाखाली राहणार असेल तर ते आपण होऊ देणार नाही, असा विश्वास येथील ग्रामस्थांना दिला.

या ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतांना काही अधिकारी मुंबईला निघून गेले आहेत. प्रशासनाचे मालकाशी हितसंबंध आहेत की काय? असा संशय आपल्यासारख्या कार्यकर्त्याला येतो, असा सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केला. ग्रामस्थांना काळे पाणी प्यावे लागत आहे. तेव्हा ग्रामस्थ चिडले असतील असे वाटले होते. परंतु ग्रामस्थ शांत आहेत. याचाच काही लोकांनी गैरफायदा घेतला आहे, असे वाटते. मात्र, आता या ग्रामस्थांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी माजी नगरसेवक परिमल भोसले, विष्णू सकपाळ, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे, शुभम पिसे, माऊली चव्हाण, राजा यादव, ग्रामस्थ सलीम चिकटे, सुरेश भुवड, प्रवीण भुवड, विजय झोरे, अनिल भुवड, अनंत भुवड, रामचंद्र भुवड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच उपविगीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, सावर्डेचे सहायक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड, परिक्षेत्र वनाधिकारी श्रीमती राजेश्री किर, प्रदूषण नियंत्रण मंडळ व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button