कुणबी समाजाला जातपडताळणी दाखले देणे बंद; जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत निर्वाणीचा इशारा
जिल्ह्यातील कुणबी समाज नेतेमंडळींनी जिल्हाधिकार्यांची घेतली भेट
पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे आदेशही झुगारले
रत्नागिरी : तिलोरी कुणबी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी देण्यास प्रशासनाने दर्शविलेल्या नकार प्रकरणी जिल्ह्यातील कुणबी समाज नेते मंडळींनी जिल्हाधिकार्यांची भेट घेत वस्तुस्थिती मांडली. दाखले देता येणार नसल्याचे जात पडताळणीचे पत्र दाखवले, यापूर्वीचे शासनाचे वेळावेळीचे जीआरचे दाखले दिले. पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आदेशालाही प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचेही सांगितले. सरकारने गांभीर्याने विचार करावा अन्यथा या समाजात कधीही उद्रेक होईल, असा सूचक इशारा यावेळी देण्यात आला.
जिल्ह्यात मोठ्या संख्येने असणार्या कुणबी समाजाची अशी अवहेलना प्रशासन करत असल्यामुळे प्रशासनाच्या बाबतीत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या अन्यायाबाबत सामाजाचे नेते सुरेश भायजे, नंदकुमार मोहिते, राजाभाऊ गराटे, स्नेहा चव्हाण, कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरी अध्यक्ष्य विलास सनगरे, लांजा अध्यक्ष बी. टी. कांबळे, संगमेश्वर अध्यक्ष दत्ताराम लांबे, नंदकुमार आंबेकर आदी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांची सोमवारी भेट घेतली.
जात पडताळणी अधिकार्यांनी ज्या ज्या मुलांची तिलोरी कुणबी, कुणबी, ति. कु. व ति. कुणबी अशी कागदपत्रीय नोंद आहे अशांना दाखले देता येणार नाही, असे पत्र दिले होते. ती पत्र जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात आली. या पूर्वीचे शासनाने वेळावेळी काढलेले जीआर दाखल करून आपण दाखले देत नसल्याबाबत जाब विचारण्यात आला.