कॅरममध्ये महिला एकेरीचे विजेतेपद देवरूखच्या गुंजन खवळेने पटकावले
जिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धा
देवरूख : व्याडेश्वर कॅरम क्लब, गुहागर आयोजित रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा- २०२३ गुहागर येथेसंपन्न झाल्या. या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीचे अंतिम विजेतेपद देवरुखच्या गुंजन आशिष खवळे हिने पटकावून संगमेश्वर तालुका कॅरम असोसिएशनच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे.
गुंजन खवळे हिची रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली असून ५७व्या महाराष्ट्र राज्य कॅरम विजेतेपद स्पर्धा: २०२३-२४ स्पर्धेत महिला एकेरी व सांघिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथे दिनांक ४ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
गुंजन हिला तिचे वडील आशिष आणि मातोश्री प्रेरणा खवळे यांच्यासह योगेश साठ्ये आणि संगमेश्वर तालुका व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गुंजनने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.