केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून स्वागत
रत्नागिरी : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या काँक्रिटीकरण भूमिपूजन कार्यक्रमानंतर रायगड जिल्ह्यातून महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे हवाई पाहणी करत रत्नागिरी दौऱ्यावर आलेले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे गुरुवारी दुपारी हेलिकॉप्टरद्वारे आगमन झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी त्यांचे स्वागत केले.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीज येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तसेच रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची हवाई पाहणी करण्याच्या निमित्ताने ना. गडकरी हे गुरुवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर दाखल झाले आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संगमेश्वर मधील आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड दरम्यान सुमारे 90 95 किलोमीटर च्या टप्प्यामधील रखडलेल्या कामासंदर्भात ना गडकरी हे काय भूमिका स्पष्ट करतात, हे रत्नागिरी येथील पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर स्पष्ट होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मिरजोळे एमआयडीसी क्षेत्रातील विश्रामगृहात पत्रकारांसोबत वार्तालाप करणार आहेत.