कोकणातील तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा उद्योगांकडे वळावे
अलोरे येथील कार्यक्रमात उद्योजक राजन दळी यांचे आवाहन
अलोरे (ता. चिपळूण) : नोकरीचे उमेदवार म्हणून रांगा लावून निश्चित उत्पन्न मिळविण्यापेक्षा कोकणातील तरुणांनी उद्योजकीय मानसिकता ठेवून उद्योग सुरू करावेत. उद्योगांना कोकणात मोठा वाव आहे, असे प्रतिपादन उद्योजक राजन दळी यांनी केले.
अलोरे येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री. दळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री. दळी कृपा हेअर टॉनिकच्या माध्यमातून, उद्योग आणि उद्योजक फक्त शहरातच बहरतात, या समजुतीला छेद देणारे आणि किराणा मालाच्या दुकानापासून ते लोकप्रिय आयुर्वेदिक औषधी तेल निर्मितीचा प्रवास करणारे धोपावे (गुहागर) येथील उद्योजक आहेत. श्री. दळी यांनी आपल्या उद्योजकीय वाटचालीचा आढावा घेताना अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले, आपण सहज फिरताना भंगार, टायर, हॉटेल, लाकूड गिरणी अशा अनेक उद्योगांकडे लक्ष टाकले, तर हे सर्व उद्योग बाहेरचे लोक येऊन करतात, हे लक्षात येईल. यामध्ये कोणताही प्रादेशिक, धार्मिक, जातीय वाद मला अपेक्षित नाही. पण असे छोटे मोठे उद्योजक पुढे मोठे झालेले आपल्याला दिसतात. नकारात्मकता सोडून ते काम करतात. त्यांच्याकडून उद्योग करण्याची मानसिकता आपण आत्मसात केली पाहिजे. जिद्द, प्रामाणिकपणा, सचोटी, कष्ट करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर अवमान, अवहेलना, अडचणींचा सामना करण्याची तयारीही असली पाहिजे. कोणाच्याही यशाचे मानदंड सारखेच असतात. त्यामुळे कोणता उद्योग किंवा व्यवसाय करायचा, हे निश्चित करावे. निश्चित उत्पन्न देणाऱ्या नोकरीपेक्षा धोका पत्करून उद्योग केला, तर यश नक्की मिळेल. कोकणात वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणावर जमिनी पडीक राहतात. त्यांचा उपयोग करून उत्पन्न घेता येईल. दरवर्षी काजू आणि सागवानाची केवळ दहा झाडे लावली, तरी काही वर्षांत चांगले उत्पन्न मिळू शकेल. नोकरी मिळाली नाही, म्हणून उद्योग करण्यापेक्षा जाणीवपूर्वक उद्योग करावा. अगदी छोट्या जमिनीतून तोंडलीच्या भाजीसारखे उत्पादन घेऊन यशस्वी झालेल्या एका शेतकऱ्याचे उदाहरण त्यांनी त्यासाठी दिले.
अडचणी नेहमीच येत असतात. त्यावर मात करायला शिकले पाहिजे, असे सांगून श्री. दळी यांनी कृपा हेअर टॉनिकचा प्रसार, वाढ आणि मोठी स्पर्धा असूनही आपल्याला यश कसे मिळाले, करोनाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना मातीच्या पणत्यांचा व्यवसाय कसा सुरू केला, याविषयी सविस्तर माहिती दिली.
समारंभाला सीए वसंत लाड (दुबई), संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर अभ्यंकर, शाळा समिती सदस्या राजू कानडे, अमित मोरेश्वर आगवेकर, माजी विद्यार्थी सौ. मंजूषा देशपांडे-कुलकर्णी (पुणे), डॉ. हेमराज चिटणीस (मुंबई), डॉ. उदय फडतरे (सातारा), प्रसाद कारखानीस (मुंबई), अभिजित केशव पाठक (नवी दिल्ली), स्थानिक संयोजन समितीचे सुधाकर शिंदे, नीलिमा वडगावकर, माजी शिक्षक-कर्मचारी सुभानु गणेश पोंक्षे (दापोली), पालक प्रतिनिधी सौ. गौरी शिंदे, शर्मिला चव्हाण, विशेष विद्यार्थी राज प्रवीण शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी सोहम मोंडे, सोनाली मोहिते उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीष गांगण यांनी केले.
उद्घाटनानंतर शाळा संकुलात अनंत लक्ष्मण आग्रे स्मृतीविचार मंचावर श्रेणीयुक्त कार्यक्रम, चर्चा गटांतर्गत अकरावी-बारावी विज्ञान विद्यार्थ्यांशी राजन दळी यांनी संवाद साधला.
स्वागतयात्रेअंतर्गत शाळेच्या सकाळ सत्राच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली जलदिंडी निघाली. प्रमुख पाहुणे राजन दळी, सीए वसंतराव लाड यांनी जलपूजन आणि जलकुंभ असलेल्या पालखीचे पूजन केल्यानंतर पालखी घेऊन जलदिंडी निघाली. शाळेच्या इमारतीतून ती सवाद्य मिरवणुकीने शासकीय मैदानाकडे रवाना झाली. मैदानावर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित ५० घंटा टोल वाजवून ‘बालगोकुलम्’चा प्रारंभ झाला. बालगोकुलम् अंतर्गत लगोरी, पाच खड्यांचे खेळ, हुतूतू, काचकवड्या, आबाधुबी, गोट्या, लंगडी, सोनसाखळी, विटी-दांडू आदी पारंपरिक मातीतील खेळांमध्ये मुले रंगून गेली. कृष्ण, सुदामा आणि त्यांच्या सवंगड्यांनी पोह्यांचा प्रसाद वाटला. यावेळी शिशुविहार व प्राथमिक आणि अकरावी-बारावी कला या गटातील काही विद्यार्थ्यांनी स्मृतिस्थळाजवळ वृक्षारोपण केले. नागावे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश चिपळूणकर, उपसरपंच सुरेश साळवी, कोंडफणसवणे गावच्या सरपंच वैशाली जिनगरे, उपसरपंच सुरेश शिगवण, पदाधिकारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.