कोकण रेल्वेने कार घेऊन जायचंय तर ३ तास आधी पोहोचावे लागणार!

- कोकण रेल्वेच्या नव्या रो रो कार वाहतूक सेवेसंदर्भात खासगी कारधारकांसाठी महत्त्वाची अपडेट
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या खासगी कारधारकांसाठी यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने एक नवा आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध केला आहे. कोकण रेल्वेच्या बहुचर्चित ‘रो-रो’ (Roll-on Roll-off) कार वाहतूक सेवेची घोषणा यापूर्वीच करण्यात आली असून, आता या सेवेसंदर्भात एक महत्त्वाचा नियम जाहीर करण्यात आला आहे.
गणेशोत्सवापूर्वीच ‘रो-रो’ सेवा सुरू
प्रवाशांच्या सुविधेसाठी, कोकण रेल्वे मार्गावर दिनांक २३ ऑगस्ट २०२५ पासून ही ‘रो-रो’ सेवा सुरू होणार आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना आपली कार सुरक्षित आणि सोयीस्करपणे रेल्वेने घेऊन जाणे शक्य होणार आहे, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा ताण कमी होईल.
असे असेल कारसोबत असणाऱ्या प्रवाशांचे भाडे
रेल्वेच्या या सेवेद्वारे कार सोबत तीन माणसांना प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे. त्यांची या मालगाडीला जोडलेल्या स्वतंत्र कोच मध्ये व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी एसी 3-टियर (AC 3AC) किंवा सेकंड सीटिंग (Second Seating) कोच उपलब्ध केला जाणार आहे. यासाठी प्रति प्रवाशास 3AC साठी ₹935/- आणि सेकंड सीटिंगसाठी ₹190/- असे निर्धारित भाडे भरावे लागेल. हे वाहन आणि प्रवासी दोघांसाठीही अखंड आणि आरामदायी प्रवासाची खात्री करेल.

महत्त्वाची सूचना : ३ तास आधी पोहोचा!
या सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कारधारकांसाठी एक विशेष सूचना आहे. ज्या ठिकाणाहून ‘रो-रो’ ट्रेन सुटणार आहे, त्या ठिकाणी प्रवाशांना आपली कार घेऊन ट्रेन सुटण्याच्या किमान तीन तास आधी पोहोचावे लागणार आहे. ही वेळेची मर्यादा कार लोड करण्याच्या प्रक्रियेसाठी आणि आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे, प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच स्थानकावर पोहोचावे.”