गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणारी बोट बुडून तेरा जणांचा मृत्यू

- स्पीड बोटीने जोरदार धक्का दिल्याने झाला अपघात ; ८० पैकी ७७ प्रवाशांची सुटका, तेरा जणांचा मृत्यू
- बचाव कार्य सुरू
उरण (विठ्ठल ममताबादे ) : मुंबई समुद्र किनारी असलेल्या गेट वे ऑफ इंडिया ते इलिफंटा (घारापुरी-तालुका उरण ) या मार्गे समुद्रातून प्रवास करणारी नीलकमल ही खासगी बोट बुधवारी १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३:४५ च्या सुमारास एका स्पीड बोटीने जोरदार अचानकपणे धडक दिल्याने प्रवाशी बोटीत पाणी शिरले. पाणी शिरल्याने प्रवाशी वर्गामध्ये एकच तारांबळ उडाली. जोरदार धडक दिल्याने प्रवाशी बोट समुद्रात बुडाली. एका स्पीड बोटीने ही धडक दिल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत सायंकाळी उशिरापर्यंत एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याची खात्री झाली आहे.
या बोटीत ८० प्रवाशी होते. त्यापैकी ७७ प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या (नेव्ही )स्पीड बोटी वरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. अपघात झालेल्या नागरिकांची हेलिकॉपटरने तसेच नौदल आणि कोस्ट गार्डकडुन बचावकार्य केले गेले. इतर बेपत्ता प्रवाशांचा शोधकार्य सुरु आहे. अपघात घडल्यानंतर एका प्रवाशाने बोटीत असताना वेळेत लाईफ जॅकेट दिल्या नसल्याचा आरोप केला आहे. अपघात झाल्या नंतर पाणी बोटीत शिरल्यानंतर लाईफ जॅकेट दिले असल्याचा प्रवाशांनी सांगितले.
या संदर्भात नीलकमल या खाजगी बोटीचे मालक श्री. पडते यांनी सांगितले की, एका स्पीड बोटीमुळे सदर घटना घडली आहे. स्पीड बोट ही प्रवाशी बोटीच्या आजूबाजूला फिरत होती व थोडया वेळात स्पीड बोटने प्रवाशी बोटीला जोरदार धडक दिली त्यामुळे ही घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले.