गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या एनएसएस शिबिरातून पर्यावरण रक्षणासह जलसंवर्धनाचा संदेश!
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी शिबीराचा आजचा दुसरा दिवस. आज सकाळी 7. 30 वाजता चांदेराई गावातून पर्यावरण रक्षण आणि जल संवर्धनाच्या घोषणा देत स्वयंसेवकांनी प्रभात फेरी काढली. पाणी अडवा पाणी जिरवा, धूम्रपान सोडा निरोगी आयुष्य जोडा, सर्वांनी एकच निश्चय करा पाण्याची काटकसर करा अशा विविध घोषणा देत स्वयंसेवकांनी प्रभातफेरीने जनजागृतीचे कार्य केले.
त्यानंतर सर्व स्वयंसेवक श्रमदानासाठी नदी किनारी गेले. सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने नदीवर पाणी अडवण्यासाठी बंधारा निर्मितीचे कार्य सुरू केले. मानवी साखळी करून सर्वांनी नदीकाठावरील लहान मोठे दगड वापरून बंधारा घालण्यास सुरुवात केली. पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा देत बंधारा स्वयंसेवकांनी घातला. साधारण 98 फूट लांबीचा बंधारा घातला.
शिबिरस्थळी परत येत असताना गावाच्या मुख्य रस्त्यावरील मंडपात सामाजिक जनजागृतीचे HIV आणि एड्सविषयीचे एक पथनाट्य स्वयंसेवकांनी सादर केले. आपल्या श्रमदान व जनजागृती संदर्भातील कार्याचा स्थानिक लोकांना लाभ होत असलेला पाहून स्वयंसेवकांमध्ये उत्साह निर्माण झाला.