ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचा राग कारवर काढला
राजकीय वैमनस्यातून गाडी पेटविली असल्याचा संशय
उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायतीमधील निवडणुकीत युवा सामाजिक संघटनेने सर्वपक्षीय आघाडीचा दारुण पराभव केल्यानंतर पराभूत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हिंसक कारवाया सुरु झाल्या आहेत, अशी चर्चा गावात सुरु झाली आहे. कारण आगरी कोळी समाजातील नामवंत कलाकार, “आई तुझं देऊळ “फेम,महाराष्ट्रभूषण सचिन लहू ठाकूर ह्यांची सुझुकी सेलेरिओ कार 4 जानेवारीच्या रात्री गावगुंडानी पेटवून जाळली. विघातक राजकारणाचा एक नमुना जसखारमधील निवडणूक हरलेल्या पुढाऱ्यांनी दाखवून दिला आहे, असे सचिन ठाकूर यांचे म्हणणे आहे.
ही गाडी सचिन लहू ठाकूर ह्यांच्या घराजवळ उभी असताना दि 4 जानेवारी रोजी रात्री काही अज्ञात गुंडानी जाळली. जसखार मधील सूडबुद्धीच्या, विकृत राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या गुंडाकरवी हे कृत्य केल्याचं गावात बोललं जात आहे. सदर प्रकरणाची तक्रार न्हावा शेवा पोलीस ठाण्यात नोंदविली असून पुढील तपास चालू आहे. सदर गाडीच्या शेजारी अजून तीन रिक्षा उभ्या होत्या, ह्या चारही CNG गाडयांचा जर स्फ़ोट झाला असता तर आजूबाजूची दहा घरे पेटून जीवित आणि मालमत्तेचे खूप नुकसान झाले असते. सुदैवाने शेजाऱ्यांनी आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. समाजाच्या सर्व स्तरातून सदर विकृत, विधवंसक कृत्याचा निषेध होत असून एका चांगल्या कलाकाराचा आवाज अशा दडपशाहीने दाबला जात आहे. गावातील सुजाण, सुज्ञ नागरिक, सचिन ठाकूर ह्यांच्या पाठीशी अशा संकटकाळात उभे असून गावातील हुकूमशाहीचा, गुंडगिरीचा निषेध व्यक्त करित आहेत.