चिरनेर जि. प. गट निवडणूक समाधान म्हात्रे पूर्ण ताकदीनीशी लढणार !

उरण (विठ्ठल ममताबादे ) : महानगर पालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर आता सर्वांना जिल्हा परिषद,पंचायत समितीचे वेध लागले असून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी तर निकाल ७ फेब्रुवारी २०२६ रोजी लागणार आहेत. निवडणुकांची तारीख जवळ आल्याने सर्वच पक्षात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य पदासाठी रस्सीखेच चालू असून उरण तालुक्यात चिरनेर जिल्हा परिषद सदस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री.शरदचंद्र पवार पक्ष)चे एकनिष्ठ कट्टर प्रामाणिक कार्यकर्ते गोवठने गावचे सुपुत्र समाधान गुरुनाथ म्हात्रे यांनी दंड थोपटले असून चिरनेर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी समाधान गुरुनाथ म्हात्रे हे राष्ट्रवादीकडून पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
गाव अध्यक्ष, पूर्व विभाग अध्यक्ष, उरण तालुका युवक अध्यक्ष, जिल्हा युवक उपाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष असे अनेक पदे समाधान म्हात्रे यांनी भूषवले असून सध्या ते जिल्हा युवक अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. समाधान म्हात्रे यांनी गोवठने ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच म्हणूनही उत्तमपणे पदभार सांभाळला आहे.उरणचे नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांचे ते कट्टर समर्थक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते कट्टर एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. २०१४ साली त्यांनी पंचायत समितीचे तिकीट मागितले होते त्यावेळी आय काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळे तिकीट मिळाले नाही. परत त्यांनी २०१९ ला तिकीट मागितले असता शेकाप व राष्ट्रवादीची आघाडी झाली असल्याने शेकापला तिकीट गेल्याने समाधान म्हात्रे यांची संधी हुकली. त्यांना पंचायत समितीचे सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य बनता आले नाही.आता मात्र २०२६ मध्ये समाधान म्हात्रे यांनी चिरनेर जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शवली असून या निवडणुकीत त्यांना पक्षातर्फे तिकीट मिळावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या पक्षाचे निष्ठावान प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्त्याला तिकीट मिळाले नाही तर ते कार्यकर्त्याचा अपमान होईल, सर्वसामान्य एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलल्यासारखे होईल त्यामुळे समाधान म्हात्रे यांना जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीसाठी पक्षातर्फे उमेदवारी मिळावी, तिकीट मिळावे असे मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच उरणच्या जनतेने केली आहे. आजपर्यंत समाधान म्हात्रे यांनी जनतेसाठी अनेक विकास कामे केले आहेत. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच असताना गावात अनेक विकास कामे केली तर पक्षाच्या विविध पदावर कार्यरत असताना अनेकांना मदत करून त्यांचे प्रश्न सोडविले आहेत .समाधान म्हात्रे यांना प्रशासकीय कामांचा चांगला उत्तम दांडगा अनुभव आहे.त्यांचा जनतेशी दांडगा जनसंपर्क आहे.गोरगरिबांच्या अनेक प्रश्न त्यांनी सोडविले आहेत.
भविष्यात पाण्याचा प्रश्न रस्त्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचा त्यांचा मानस आहे त्या दृष्टीने कार्यरत राहण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा महाविकास आघाडी आता समाधान म्हात्रे यांना न्याय देते की त्यांच्यावर अन्याय करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





