जाळ्यात अडकलेल्या दोन सापांना दिले जीवदान!
- फ्रेंड्स ऑफ नेचरचे पदाधिकारी व पोलिसांनी केली सुटका
उरण दि २० (विठ्ठल ममताबादे ) : कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे जाळ्यात अडकलेल्या दोन सापांचे प्राण वाचवण्यात ‘फ्रेंड्स ऑफ नेचर’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे या सापांची सुटका होऊ शकली.
१९ जून २०२४ रोजी संध्याकाळी उरणमधील पोलीस कर्मचारी खैरावकर यांचा फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) च्या हेल्पलाईनवर कॉल आला की, खोपटा पुलाच्या चौकाच्या पुढे करंजा रोड लगत जाळयात २ साप अडकले आहेत. सेवेवर असणाऱ्या पोलिसांच्या या जाळयात अडकलेल्या सापांवर लक्ष गेलं आणि त्यांनी मदतीसाठी कॉल केला. जर हे जाळयात अडकलेले साप त्यांच्या नजरेत पडले नसते तर ते तडफडून मेले असते. अंधार पडत चालला होता ,पावसाने चांगला जोर धरला होता. कॉलरने लोकेशन शेअर केले होते. ट्रॅफिक आणि पावसामुळे तिथे पोहोचायला उशीर होत होता. लोकेशनवर जाऊन पाहिलं तर तेथे धामण साप जाळयात अडकला असल्याचे आढळले. सुटकेच्या प्रयत्नात थकला होता. फ्रेंड्स ऑफ नेचरच्या पदाधिकारी असलेल्या सर्पमित्रांनी लवकरात लवकर या सापांची सुटका करून पिशवीत भरले व दुसऱ्या सापाचा शोध घेतला.दुसरा साप दिसून येत नव्हता. एका प्लायवूडच्या खाली असल्याकारणाने कोणाच्या नजरेस येत नव्हता. मानेच्या बाजूला जाळ्याचे २ धागे अडकले होते. त्याला जाळेमुक्त करून लवकरात लवकर दोन्ही ही धामण साप सुरक्षित ठिकाणी मुक्त केले.
याकामी पोलीस हवालदार, खैरावकर (उरण वाहतूक शाखा), पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड(उरण वाहतूक शाखा), पोलीस नाईक मस्के (उरण पोलीस स्टेशन),पोलीस नाईक मुळे (उरण पोलीस स्टेशन) व स्नेहा जोशी यांचे सहकार्य लाभले. या दोन्ही सापाचे प्राण वाचविणाऱ्या केअर ऑफ नेचर या पर्यावरण प्रेमी संघटनेचे पदाधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.