महाराष्ट्रलोकल न्यूज
जासई उड्डाणपुलावरील अपघातात उरणमधील दोघांचा जागीच मृत्यू

उरण दि १० (विठ्ठल ममताबादे ) : उरणमध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून त्यातही अपघात होऊन मृत्यू चे प्रमाण देखील वाढले आहे. उरणमध्ये दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून उरण मध्ये अनेक लहान मोठे अपघात सुद्धा होत आहेत. यातच अपघात होऊन अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. अशीच घटना उरण तालुक्यात घडली आहे. दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास उरणमधील अनिश नायर राहणार कुंभारवाडा- उरण,वय २६ तसेच अभिजित भुवड राहणार बोरी -उरण,वय ३० हे घरी परतत असताना उरण तालुक्यातील जासई येथील उड्डाणपुलावर त्यांचा भीषण अपघात झाला या अपघातात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.


अपघात करणारी व्यक्ति अपघात करून पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. सदर अपघात कसा झाला, हा अपघात कोणी केला याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. मात्र या दुर्घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्य पद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अनेक महत्वाच्या मार्गावर, सर्कल तसेच चौकात ट्रॅफिक पोलीस, सुरक्षा रक्षक नसल्याने असे अपघात होत आहेत. तसेच अपघात झाल्यानंतर अपघात झालेल्या व्यक्तींना योग्य वेळेत हॉस्पिटल मध्ये उपचार मिळत नसल्याने मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
मुळात उरण मध्ये अत्याधुनिक सेवा सुविधाने सुसज्ज असे एकही हॉस्पिटल नसल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अपघात ग्रस्त व्यक्तींना वेळेत उपचार मिळाल्यास अनेकांचे जीव वाचले जाऊ शकतात. त्यामुळे उरण मध्ये सुसज्ज व अत्याधुनिक सेवा सुविधाने युक्त असे हॉस्पिटल बांधावे व प्रत्येक चौकात, सर्कल मध्ये व महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, ट्रॅफिक पोलीस, ट्रॅफिक हवालदारांची नेमणूक करावी अशी मागणी जनतेनी केली आहे.