डाटा एंट्री ऑपरेटर कंत्राटी पदाची भरती
इच्छुक उमेदवारांनी पदभरतीसाठी २३ रोजी उपस्थित रहावे
रत्नागिरी, दि. १८ (जिमाका):- जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) घटक कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर (कंत्राटी) दोन पदे भरावयाची आहेत. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, ता. जि. रत्नागिरी येथे २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. संगणक अर्हता MS-CIT व टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि.व इंग्रजी ४० श.प्र.मि. असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे आहे. मासिक एकत्रित मानधन १५ हजार रुपये आहे.
हे पद राज्य शासनाचे नियमित पद असून निव्वळ कंत्राटी स्वरुपात आहे. निवड झालेल्या उमेदवारांचा नेमणूक कालावधी हा त्यांच्या निवडीनंतर ३१ मार्च २०२४ पर्यंत राहील. निवड प्रक्रिया केवळ पात्र उमेदवारांची मुलाखत तसेच संगणकावरील टंकलेखन चाचणीद्वारे करण्यात येईल व उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय हा समितीचा राहील. निवड झालेल्या उमेदवारांना समितीने तयार केलेल्या अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील. १०० रुपयांच्या बंधपत्रावर करारनामा सादर करावा लागेल. आवश्यक दस्तऐवजांची स्वसाक्षांकित एक छायाप्रत (स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे, संगणक अर्हता MS-CIT आणि टंकलेखन मराठी व इंग्रजी, शाळा सोडल्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला) सोबत आणावी. निवडीसाठी शिफारस अथवा दबाव आणल्यास उमेदवार अपात्र ठरविला जाईल.
पदभरतीची प्रक्रिया अत्यंत तर्कशुध्द व पारदर्शक पध्दतीने गुणवत्तेच्या आधारे पार पाडली जाणार असल्याने कोणीही कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी कळविले आहे.