डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित रानभाज्या पाककला स्पर्धा

सावर्डे : डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने रानभाज्या पाककला स्पर्धा दि. 16 जुलै 2024 रोजी उत्साहात संपन्न झाली. संस्थेचे संस्थापक कृषिभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते फित कापून तसेच संचालक सुरेशजी खापले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, संचालिका सौ. अंजलीताई चोरगे, डॉक्टर शमिका चोरगे, डॉ. संकेत कदम ,श्री रावसाहेब सुर्वे ,श्री नयन सुर्वे, श्री मानसिंग महाडिक, सौ. गीता पाटील, श्री नारायण पाटील, प्राचार्य श्री. सचिन तांबेकर तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थीनी विद्यार्थी उपस्थित होते.
या स्पर्धेत 55 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये भारंगीची भाजी ,अळूची भाजी, अळूवडी, टाकळ्याची भाजी, टाकळ्याची वडी, आकुरची भाजी इत्यादी विविध भाज्यांचा रानमेवा विद्यार्थ्यांनी सादर केला. तसेच काही विद्यार्थ्यांनी या भाज्यांपासून डोसे, भजी असे वैविध्यपूर्ण प्रकार बनवले. सह्याद्रीच्या डोंगरातून उगवणाऱ्या या भाज्यांचा मेळावाच भरला आहे असे चित्र पाहायला मिळाले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शमिका चोरगे, शालेय समिती सदस्या सौ. गीता पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. रोशन मोहिरे हे लाभले.
या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक 500/- द्वितीय क्रमांक 300/- तृतीय क्रमांक 200/- तसेच उत्तेजनार्थ 51/- रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.