दाओसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या दालनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
दावोस : येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचे (महाराष्ट्र पॅव्हेलियन) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांचेसह उद्योग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
५४ व्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस इथे यावर्षी मी पुन्हा आलो आहे, गेल्या वर्षी याच ठिकाणी विविध उद्योग-कंपन्यांबरोबर केलेल्या करारांमधून त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन राज्याच्या गतीला चालना दिली आहे. महाराष्ट्राला गुंतवणुकीचे सर्वोच्च राज्य बनविणे आणि ते टिकवून ठेवणे याला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
यावर्षी उत्पादन, अन्न प्रक्रिया, डिजिटल- नैसर्गिक संसाधने यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये राज्यात मोठी गुंतवणूक येईल, यावर विशेष भर दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील त्यातून शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वच घटकांना फायदा होईल, यावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.