दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी सर्वपक्षीय दबाव वाढला
- आता लक्ष दादर-रत्नागिरी पॅसेंजर कधी पूर्ववत होते याकडे
रत्नागिरी : कोरोनाच्या नावाखाली पूर्वी रत्नागिरीहून दादरपर्यंत रोज धावणारी पॅसेंजर सेवा दिव्यापर्यंतच मर्यादित करून दादर- रत्नागिरी पॅसेंजर गाडीच्या वेळेत गोरखपूर मार्गावर रेल्वे सेवा सुरू झाली आहे. या विरोधात वेगवेगळ्या प्रवासी संघटनांसह कोकणातील सर्वपक्षीय दबाव वाढला आहे. त्यामुळे दादर येथून पूर्वीप्रमाणेच रत्नागिरीसाठी पॅसेंजर सेवा कधी सुरू होते, याकडे आता प्रवासी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रमुख मागण्यांसाठी कोकणातील सर्वपक्षीय एकवटल्याचे प्रथमच दर्शन
कोकण रेल्वे हे स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे भारतीय रेल्वेच्या इतर झोनप्रमाणे ‘केआर’ झोन मधील विकास कामांना मर्यादा येतात. हे लक्षात घेऊन कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यासाठी सर्वपक्षीयांमध्ये एकमत झाल्याचे प्रथमच दिसत आहे. याचबरोबर आता मागील अनेक महिन्यांपासून दादर ते रत्नागिरी या मार्गावर पूर्वीप्रमाणेच पॅसेंजर सेवा सुरू करण्याच्या मागणीला सर्वपक्षीय पाठिंबा लाभला आहे. कोकणवासीय रेल्वे प्रवासी जनतेसाठी अशा प्रकारे सर्वपक्षीय एकवटल्याचे पहिल्यांदाच दर्शन घडत आहे.
मनसे, भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच शिंदे शिवसेनेसह इतरही राजकीय पक्षांनी कोकणवासियांच्या या दोन महत्त्वाच्या प्रश्नांबाबत दबाव वाढवला आहे, जी बाब प्रवाशांसाठी आशादायी ठरत आहे कोकणवसीय प्रवासी जनतेच्या या मागण्यांसाठी प्रसारमाध्यमांसह रेल्वे प्रवासी संघटनांनी सातत्याने आवाज उठवला होता. आज दिनांक ९ जानेवारी रोजी सायंकाळी मुंबईत शिवसेनेचे (उबाठा) शिष्टमंडळ रत्नागिरी- सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेचचे महाप्रबंधक व COM ( चीफ ऑपरेटिंग मॅनेजर ) यांना भेटले. या शिष्टमंडळाने दादर येथून रत्नागिरीसाठी धावणारी पॅसेंजर गाडी लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी केली.