दापोलीत सायकल फेरीतून महिला सक्षमीकरणाचा संदेश!
महिला दिननिमित्ताने दापोली सायकलींग क्लबचा उपक्रम
दापोली : ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, १२ मार्च २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. दापोलीच्या जडण घडणीमध्ये महत्वाचे योगदान दिलेल्या अनेक आदरणीय महिला या सायकल फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली- उपजिल्हा रुग्णालय- एसटी आगार- पोलीस स्टेशन- बाजारपेठ- पोस्ट ऑफिस- शिवाजीनगर- नवभारत छात्रालय- आझाद मैदान असा ६ किमीचा होता. या मार्गावरील काही महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच ठिकठिकाणी सायकल फेरीचे खाऊ, चिक्की, लाडू, कॅडबरी, पाणी, सरबत देऊन स्वागत केले गेले. विचारे प्रॉडक्ट महिला गृह उद्योग कारखान्याला भेट देऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञान मशिन्स बद्दल माहिती जाणून घेतली.
दापोली उपजिल्हा रुग्णालय येथील परिसेविका घाग, जाधव, डॉक्टर, कर्मचारी, दापोली पोलीस स्टेशन उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, मंजुश्री पाडावे आणि महिला पोलीस, एसटी आगार व्यवस्थापक रेश्मा मधळे, व्यवसायिक उद्योजिका माधुरी विचारे, अर्पिता मालू, वैशाली मेहता, श्रद्धा गायकवाड, नेहा तोडणकर, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील स्मिता सुर्वे, रितू मेहता, संजीवनी कदम, सारिका तलाठी, वर्षा गोरीवले, डॉ. मानसी फाटक, डॉ. शुभांगी फाटक, डॉ. आनंदी सावंत, जयश्री खानविलकर, सुजाता प्रधान, योगसाधक अक्षदा साळवी, स्नेहा भाटकर, भाजीविक्रेते, प्रगतशील शेतकरी, गृहिणी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही महिलांचा गौरव करण्यात आला, समाजासाठी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. अनेक महिलांनी सायकल फेरीमध्ये सहभाग घेऊन सोबत सायकल पण चालवली.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात केतन पालवणकर, अंबरीश गुरव, उत्तम पाटील, पराग केळसकर, अमोद बुटाला, संदीप भाटकर, सत्यवान दळवी, संजय पिंगळे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली.