दापोलीत सायकल फेरी काढून वसुंधरा दिवस साजरा
वसुंधरा दिनानिमित्त दापोली सायकलिंग क्लबचा उपक्रम
दापोली : आपल्या एकुलत्या एक पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करुन देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २३ एप्रिल २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. या दरम्यान कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील अपारंपारिक ऊर्जा उद्यानाला भेट देऊन वसुंधरा आणि सौर ऊर्जेबद्दलची, उपकरणांची माहिती करुन घेण्यात आली.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, केळसकर नाका, बुरोंडी नाका, अपारंपारिक ऊर्जा उद्यान, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, छात्रालय, आझाद मैदान असा ६ कि.मी.चा होता.
अपारंपरिक ऊर्जा उद्यान येथे डॉ अतुल मोहोड, नितीन पालटे आणि सहकारी यांनी तेथील आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे, नवीन प्रयोग बद्दल माहिती सांगितली. तसेच सौर जल शुद्धीकरण यंत्र, सौर उष्ण जल संयंत्र, सुटकेस सौर पेटी चुल, सुधारीत चुली, सौर कंदिल, उष्णता पुनर्प्राप्ती प्रणालीसह सुधारीत कुक स्टोव्ह, सौरचलित क्रिम विभाजक, भात पाखडणी सयंत्र, बायोगॅस सयंत्र, सौर टनेल वाळवणी यंत्र, कृषी अवशेष जैव वायु सयंत्र, जैव अवशेष ब्रीक्वेटिंग यंत्र, शेत तळे व ग्रीन हाऊस इत्यादी यंत्र दाखवली.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात केतन पालवणकर, अंबरीश गुरव, अमोद बुटाला, विनय गोलांबडे, राकेश झगडे, रागिणी रिसबूड, अक्षता साळवी इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर जास्त करा आणि ३० एप्रिल ३०२३ रोजी होणाऱ्या दापोली समर सायक्लोथॉन २०२३, सिझन ३ मध्ये सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन पण आयोजकांनी केले आहे.