नगर पंचायत व महावितरणने उडवली लांजावासीयांची झोप !
लांजा : गेल्या २४ तासांपासून लांजा शहरास तालुक्यात वीज गायब असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे त्रस्त नागरिकांनी महावितरणच्या अनागोंदी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाळा सुरु झाला आहे. पाऊस पडत आहे. त्यामुळे मस्त झोप लागेल.. कुणी घोरत झोपेल.. तर कुणी पडल्या पडल्या झोपी जाईल.. पण लांजावासीयांची झोप अक्षरशः उडाली आहे. आणि झोप उडविण्यासाठी कारण ठरले आहे गायब असलेली वीज आणि मच्छर..!!
गेला आठवडाभर लांजा शहरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सायंकाळ झाली की बऱ्याच वेळा बत्ती गुल होते आहे. गेले दोन तीन दिवस रात्रभर वीज गायब झाली होती. सद्यस्थितीत पाऊस पडला तरी हवामानात उकाडा आहे.
दुसरं म्हणजे लांजा नगरपंचायतीची अनास्था. मच्छर पैदास रोखण्यासाठी नगरपंचायत कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने मच्छर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. लांजा शहरात दिवसेंदिवस वाढत चालणारी लोकवस्ती, गटारातील सांडपाणी, शौचालये, स्वच्छतागृहे आदींमुळे मच्छर पैदास खूपच वाढली आहे. सायंकाळी काळोख पडताच मच्छरांच्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडतात. त्यामुळे संध्याकाळ होताच खिडक्या दरवाजे बंद करुन घ्यावे लागते. पर्यायाने गरम व्हायला सुरुवात होते. पंख्यांची हवा घेऊन गर्मी व मच्छरांपासून दिलासा घेण्याचा प्रयत्न केला जातो.
तर बरेच जण मच्छर रॅकेट घेऊन मच्छर मारतात तर काही जण गुड नाईट मच्छर रोखणारे द्रव जाळतात, तर काही जण शरीराला मच्छरविरोधी मलम लावतात. पण मच्छर आपले काम सोडत नाहीत.त्यामुळे पंखा जोरात सुरु ठेवूनच गाढ झोप लागते.
मात्र गेले काही दिवस रात्रीच वीज गायब होत असल्याने लांजावासीयांची झोपच उडाली आहे. मच्छरांचे गुणगुणत चावा घेणं.. त्यामुळे झोपमोड होते आहेत. महावितरणची वीज जाणे व नगरपंचायतीचे मच्छर पैदासींकडे झालेले दुर्लक्ष यामुळे लांजावासीय हैराण झाले आहेत.
सांडपाण्याची उघडी गटारे, इमारतींचे पॅसेजमध्ये फवारणी होणे आवश्यक आहे. अशी फवारणी लांजा नगरपंचायत क्षेत्रात होत नसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यू, मलेरिया असे आजार डास- किटक दंशामुळेच होतात. त्याला प्रतिबंधक उपाय करुन शहरवासीयांचे आरोग्य जीवन निरामय करण्यासाठी नगरपंचायतीने पावले उचलली पाहिजेत, तसेच महावितरणचा खेळखंडोबा थांबायला हवा, अशी मागणी शहरवासीयांमध्ये जोर धरु लागली आहे.