नवभारत छात्रालयात शिक्षणासह संस्कारांची जडणघडण : माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते
सामंत-शिंदे गुरुजी स्मृती मेळावा संपन्न; सेवाव्रती शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कार वितरण सोहळा
संगमेश्वर : नवभारत छात्रालयात आपण शिकलो आणि आपण येथील विद्यार्थी आहोत. येथे केवळ शिक्षण दिले जात नाही तर संस्कार केले जातात. या संस्कारांच्या जोरावर हजारो विद्यार्थी येथे घडले. डोक्यावर लोखंडी ट्रंक घेऊन आपण या नवभारत छात्रालयात आलो होतो. वन विभागाच्या कार्यालयाजवळील ओढ्यालगत आपल्याला ठेच लागली आणि ट्रंक डोक्यावरुन खाली पडली. छात्रालयात प्रवेश करण्यापूर्वी पायाला लागलेली ठेच खूप काही शिकवून गेली. या छात्रालयातील संस्कारांनी आपल्याला केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहचवले. येथील संस्कारांमुळे नवभारत छात्रालयाचा विद्यार्थी असल्याचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटत आला असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दापोली येथे नवभारत छात्रालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
कुणबी सेवा संघ दापोली संचलित नवभारत छात्रालय दापोली येथे २२ जानेवारी २०२३ रोजी नवभारत छात्रालयाचे संस्थापक आद्य संचालक सामंत गुरुजी यांचा ५७ वा व त्यांचे प्रथम शिष्य शिंदे गुरुजी यांचा स्मृती मेळावा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला . या समारंभासाठी प्रमुख अतिथी डॉ . सुदाम कदम , कार्यक्रमाचे अध्यक्ष छात्रालयाचे माजी विद्यार्थी, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी भूषविले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात अनंत गीते पुढे म्हणाले की , नवभारत छात्रालयाला आज ७५ वर्षे पूर्ण होवून गेली आहेत. गतवर्षी या छात्रालयाने अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले . या ७५ वर्षांच्या कालावधी मध्ये संस्थेने अनेक कुटुंबे उभी केली आहेत. आमचे गीते कुटुंब त्यापैकीच एक आहे. या छात्रालयाचे असंख्य उपकार आमच्या गीते कुटुंबीयांवर आहेत. मी या गीते कुटुंबाचा एक सदस्य आहे याचा मला अभिमान आहे. आर्थिक नियोजनात शिक्षणासाठी फारच कमी तरतूद केली जाते. त्यामुळे आज उपलब्ध असलेली शिक्षण पध्दती स्विकारुन आपली प्रगती करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे असे गीते यांनी अखेरीस नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुद्वयांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करुन व मान्यवरांनी वंदन करुन झाली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थाध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची आणि संस्थेच्या नियोजित उपक्रमांची माहिती थोडक्यात विषद केली. छात्रालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भरारी अंकाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले . छात्रालयाचे माजी छात्र आणि माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते यांनी दोन्ही गुरुंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती पुरस्काराचे वितरण रोख पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ देवून अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्राथमिक – माध्यमिक शिक्षक, उत्कृष्ट शेतकरी, कृषी विस्तार कार्यकर्ता, यशस्वी कृषी उद्योजिका या सात जणांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महेंद्र कदम यांचे वर्तमान शिक्षण व्यवस्था आणि भविष्य या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले. शिक्षण क्षेत्रातील विविध आयामांचा त्यांनी आढावा घेतला. उच्च शिक्षण समाजातील खालच्या स्तरापर्यंत नेण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खासगी शिक्षण संस्था वाढीसाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे ग्रामिण भागासाठी महाविद्यालयीन शिक्षण, तंत्रशिक्षण , वैद्यकीय शिक्षण उपलब्ध झाले असे कदम यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे नियोजन संस्थाध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, सहसचिव राजेंद्र शिंदे , रविंद्र गायकर, सुषमा शिंदे, सौ. गार्गी सावंत आदींची साथ मिळाली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्था कर्मचारी रवींद्र गोरीवले, प्रशांत मांडवकर, सुजीत गोलामडे, वर्षा गोरीवले, रेणूका शिंदे, समीर शिबे, मिलींद पाथे, संजय पड्याळ, किर्ती घाग, रामचंद्र दवंडे, कमलाकर मुळे, प्रियांका साखरकर, समीधा कोकमकर, जीविका शिगवण, अक्षता गोरिवले, विद्या पड्याळ यांनी विशेष परीश्रम घेतले. कार्यक्रमाप्रसंगी प्रार्थना आणि वंदेमातरम् कन्या छात्रालयाच्या विद्यार्थींनींनी सादर केले.
कार्यक्रमाचे उत्तम आणि नेटके सुत्रसंचालन प्रभाकर तेरेकर यांनी तर आभार प्रदर्शन लहू केसरकर यांनी केले .