महाराष्ट्रलोकल न्यूज

नवभारत छात्रालय परिवारातर्फे मोफत भाजीपाला बियाणे वाटप कार्यक्रम

  • सहा तालुके, २७ गावे, ६५१ लाभार्थी

संगमेश्वर दि. १४ : कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवारातर्फे यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर आणि लांजा या सहा तालुक्यामधील २७ गावांमधील ६५१ शेतकऱ्यांना पावसाळी हंगामासाठी मोफत भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. परिवारातर्फे गेली दहा वर्षे सातत्याने हा उपक्रम विविध गावांमध्ये राबविला जातो.

यावर्षी या उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील भोपण, पालगड, पांगारी तर्फे हवेली, कोळबांद्रे, मुर्डी, चाचवळ, बोरथळ, मंडणगड तालुक्यातील तोंडली, दहागांव, खेड तालुक्यातील सोनगाव, घाणेखुंट, तिसंगी, सुसेरी नं.२, चिपळूण तालुक्यातील कळकवणे, कळंबट, पेढे , कोकरे, नायशी, कळवंडे, गुहागर तालुक्यातील पिंपळवट (आरे ), पिंपर, देवघर, घाली, मुंढर, असगोली आणि लांजा तालुक्यातील इसवली-पनोरे या गावांमध्ये भाजीपाला बियाण्याचे वाटप करण्यात आले. यातील तोंडली, सुसेरी नं.२, भोपण, पांगारी तर्फे हवेली आणि घाणेखुंट या गावांमध्ये कुणबी सेवा संघाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. उर्वरित गावांमध्ये संस्थेचे आजीव सभासद व प्रतिनिधी मार्फत बियाणे वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला.

परसबागेत भाजीपाला तयार करण्यासाठी अत्यंत कमी प्रमाणात बियाणे लागते आणि एवढ्या कमी प्रमाणात बियाणे बाजारात उपलब्ध होत नसते. यावर उपाय म्हणून अगदी छोट्या प्रमाणात भाजीपाला बियाणे वाटपाची संकल्पना नवभारत छात्रालय परिवारातर्फे कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या प्रेरणेने राबविण्यात आली. यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांनी पुढाकार घेतला. गेली दहा वर्षे हा उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबविला जात आहे.

या उपक्रमामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या भाजीपाला जातींच्या बियाण्यांचा समावेश करण्यात आला. एका पाकिटात पडवळ (कोकण श्वेता ) १० बिया, कारली (कोकण तारा ) १० बिया, भेंडी (कोकण भेंडी ) २५ बिया, शिराळी (कोकण हरिता ) ६ बिया, काकडी (शीतल ) १५ बिया आणि भोपळा (सी एम १४) ४ बिया या भाजीपाल्याच्या बिया समाविष्ठ करण्यात आल्या. यासोबतच लागवडीच्या तांत्रिक माहितीचे पत्रकही शेतकऱ्यांना पुरविण्यात आले. या उपक्रमात एकूण ६५१ शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे लागवड करून भाजीपाल्याचे उत्पादन घ्यावे आणि पुढील हंगामासाठी भाजीपाला बियाणे तयार करावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यातून विद्यापीठाने विकसित केलेल्या भाजीपाला जातींच्या बियाण्याचा प्रसार गावागावातून होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी छात्रालयाचे माजी विद्यार्थी सर्वश्री प्रदिप इप्ते, विश्वनाथ तांबडे, दिनेश राणे, सुनील गुरव, सदस्य चंद्रकांत मोहिते, शिवप्रसाद चौगुले, शांताराम कोळंबे (पालगड), श्री. लांजा येथील कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष शांताराम गाडे, सामाजिक कार्यकर्ती सौ.श्रद्धा चिखले, कृषि महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. प्रवीण झगडे, समीर उसरे, श्री समर्थ उद्योग समूह कोकणचे संजय भागवत यांची मोलाची मदत झाली.

कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, सेक्रेटरी हरिश्चंद्र कोकमकर, खजिनदार प्रदीप इप्ते, सदस्य चंद्रकांत मोहिते, प्रभाकर तेरेकर यांनी परिश्रम पूर्वक या उपक्रमाची अंमलबजावणी केली. कुणबी सेवा संघांचे कर्मचारी सुनिल ठाकूर, सौ. स्वाती विचले, सौ. रेणुका शिंदे, सौ. किर्ती घाग यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button