नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव देणार : केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री मुरलीधर मोहोळ

उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव दोन्ही विधिमंडळानी पास करून केंद्राला पाठविला आहे. त्यामुळे नाव तर दिबांचेच देणार अन्य नावाचा विचारही नाही असे ठाम आश्वासन केंद्रीय नागरी उडयन मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी आज येथे दिले.
राजेश गायकर (कामोठे), विनोद म्हात्रे (उरण – जासई ), किरण पवार ( कोल्ही कोपर ),शरद ठाकूर (माजी उपसरपंच धुतुम) यांनी आज केंद्रीय उडयन मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांची विमानतळ नामकरणाबाबत मुंबई येथे भेट घेतली. लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात देण्याबाबत राज्य शासनाचा ठराव नागरि विमान उड्डयन मंत्रालयात पाठवण्यात आला मात्र विमानतळ सुरू होण्यापूर्वी सदर नामकरणाची घोषणा कधी होणार हे जाणून घेण्यासाठी या नामकरण कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मंत्र्यांची नवीन नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेतली. विनोद म्हात्रे यांनी याबाबतचे एक निवेदन केंद्रीय मंत्र्यांना दिले. त्यावर राजेश गायकर यांनी नामकरण कधी घोषित होईल याबाबत केंद्रीय मंत्र्यांना विचारणा केली. यावर मंत्री महोदयांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडून केंद्रीय कॅबिनेट कडे सदरचा प्रस्ताव पाठविला असून केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळताच तो आमच्या मंत्रालयाकडे परत येईल तशी त्याची घोषणा होईल असे सांगितले.
विनोद म्हात्रे यांनी यावर विमानतळास अन्य नावाचा विचार होतोय का ? अशी चर्चा काही लोक करीत असल्याचे सांगितले यावर केंद्रीय मंत्र्यांनी मा. दि बां पाटील नावा व्यतिरिक्त अन्य कुठल्याही नावाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून आलेला नाही आणि केंद्राचाही अन्य कुठल्याही नावाचा विचारही नसल्याचे त्यानी यावेळी उपस्थितांना ठामपणे सांगितले.