नाणीज संस्थानच्या रुग्णवाहिका चालकांचा आरटीओ-पोलीस प्रशासनाकडून गौरव
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा उपक्रम
नाणीज : मुबई-गोवा महामार्गावर अपघातातील जखमींना तत्परतेने रुग्णालयात दाखल करून चोख सेवा बजावणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका चालकांचा गौरव करण्यात आला. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रत्नागिरी पोलीस प्रशासनातर्फे हा सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुंबई- गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांसाठी विशेष सेवा बजावणाऱ्या चौघांचा सत्कार झाला. अन्य चौघांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. सत्कारमूर्ती असे -धनेश केतकर (हातखंबा), गुरुनाथ नागवेकर (संगमेश्वर), मुकुंद मोरे (कशेडी), मंगेश रसाळ (नाणीज). त्यांचा सत्कार राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी गायकवाड यांनी आपल्या भाषणात संस्थानच्या कार्याचा गौरव केला. संस्थानच्या चालकांनी महामार्गावरील अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा, कशेडी घाट, संगमेश्वर येथील रुग्णवाहिका सर्वात जास्त कार्यरत असतात. या टापूत अधिक अपघात होतात. तेथील चालक स्वतःचा जीव धोक्यात घालून हे काम करतात. त्यांनी अनेकवेळा दरीतून, पाण्यातून जखमींना व मृतदेह बाहेर काढले आहेत. जखमी रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांचा जीव वाचवला आहे.
या कार्यक्रमाच्यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहननिरीक्षक ऋषीराज कोराने, ज्येष्ठ लिपिक गणेश नाचणकर, सहाय्यक मोटार निरीक्षक संकेत सोमनाचे, अमोल कदम व संस्थानचे जनसंपर्क अधिकारी राजन बोडेकर आदी उपस्थित होते.
जगद्गुरू नरेंद्राराचार्य महाराज संस्थान गेली बरा वर्षे महामार्गावरील अपघात ग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिकांचा उपक्रम राबवित आहे. संस्थानच्या ३७ रुग्णवाहिका महाराष्ट्राच्या हद्दीतील विविध महामार्गावर अविरत सेवा बजावीत आहेत. अपघाताचा फोन आला की ती रुग्णवाहिका तातडीने अपघातस्थळी धाव घेते. संबंधित जखमी प्रवाशांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करतात. संस्थानची ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. त्यासाठी त्या रुग्णांकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून कसलेही पैसे घेतले जात नाहीत. या उपक्रमामुळे आजवर सतरा हजाराहून आधिक जखमींचे प्राण वाचले आहेत.