निविदा प्रक्रियेनंतरही लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात नाही
लांजा : लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतरित इमारतीचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट न झाल्याने एक वर्ष होऊनही नवीन इमारतीचे बांधकाम कामाला प्रारंभ झालेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी 31 जुलैला नवीन इमारतीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. 31 जुलैची डेडलाईन होती. सुमारे 12 कोटी रुपये खर्चची नवीन इमारतीची निविदा प्रक्रिया होऊन वर्ष उलटले आहे.
जुन्या इमारतीतील लांजा ग्रामीण रुग्णालय कामकाज आता सांस्कृतिक भवनाच्या इमारतीत स्थलांतर होणार आहे परंतु सांस्कृतिक भवन या इमारतीच ‘फायर सेफ्टी ऑडिट’, तसेच रुग्णालयातील वैद्यकीय विद्युत उपकरणांचे ‘इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट’ करण्याचे आदेश आहेत तसा प्रस्ताव लांजा सार्वजनिक बांधकाम विभागाने अग्निशामक प्राधिकरण आणि महावितरणला दिला आहे. परंतु फायर ऑडिटचा अहवाल अद्याप आलेला नाही. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ‘फायर सेफ्टी ऑडिट’, तसेच रुग्णालयातील वैद्यकीय विद्युत उपकरणांचे ‘इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट’ करण्याचे आदेश राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसह सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याशिवाय अन्य तपासण्यासह अहवाल देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
भंडारा जिल्हा रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांसह आरोग्य संस्थांचे फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अॅँड लाइफ सेफ्टी मेजर्स अॅक्ट २००६ च्या अनुषंगाने फायर सेफ्टी ऑडिटची प्रभावी अंमलबजावणीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. फायर सेफ्टी ऑडिटसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच अन्य आरोग्य संस्थांचे फायर सेफ्टी ऑडिट त्वरित करून घेण्याच्या सूचना फायर एस्टिंगविशर, बांधकाम संरचनाबाबत आधी फायर सेफ्टी प्राधिकरणाची पूर्तता प्रमाणपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे, असेही आदेश देण्यात आले. रुग्णालयां अतिदक्षता विभाग (आयसीयू), एचडीयू, एसएनसीयू, ऑक्सिजन युनिट, इतर कक्षांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या वैद्यकीय विद्युत उपकरणांचे इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करून घेण्यात यावे. या उपकरणांच्या देखभालीसाठी बायोमेडिक इंजिनीअर, एका कंपनीसोबत देखभाल दुरुस्तीबाबत करार केला. त्यानुसार सर्व उपकरणांचे ऑडिट करण्यात येऊन सर्व उपकरणांची दुरुस्ती प्राधान्याने करण्यात यावे, जिल्हा अग्निशामन प्राधिकरणांच्या मदतीने सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये फायर सेफ्टीच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे फायर सेफ्टीबाबत प्रशिक्षण घेण्यात यावे, असे सुचवण्यात आले आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथील जनता दरबारात लांजा ग्रामीण रुग्णालय ईमारत दिरगाई बाबत खडे बोल सुनावले होते 31 जुलै पूर्वी जुनी इमारत पाडवी आणि प्रस्तावित इमारतीत रुग्णालयाचे कामकाज सुरू करावे असे आदेश दिले होते सुरुवातीला नर्सिंग निवासी संकुल मध्य रुग्णालय स्थलांतरित करण्याचें ठरले होते. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ही फायर ऑडिट बाबत लक्ष दिलेले नाही.