पत्रकार मुस्कटदाबीच्या निषेधार्थ रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
रत्नागिरी : पत्रकारांची गळचेपी, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने त्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी सकाळी रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पत्रकारांची मस्कटदाबी यापुढे सहन केली जाणार नाही, असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनाला राजकीय पक्षांसह वकील तसेच व्यापारी वर्गाकडूनही पाठिंबा दर्शविण्यात आला.
जिल्ह्यातील दापोलीमधील एका पत्रकार बांधवाने कव्हर केलेला वृत्तांत न रुचल्याने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून अब्रू नुकसानाचनीच्या दाव्याची भीती दाखवून मुस्कटदाबी केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. असे प्रकार राज्यभरात सर्वत्र वाढीस लागल्याने रत्नागिरीत विविध प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी एकत्र येत या प्रकाराचा निषेध केला आहे.
पत्रकारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न यापुढे अजिबात सहन केला जाणार नाही, असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. यावेळी पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत काळ्या फिती लावून तसेच पत्रकारांची गळचेपी केल्याच्या प्रकाराचे निषेध करणारे फलक हातात घेऊन ‘नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, पत्रकार एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा दिल्या.
दरम्यान, नुकताच पत्रकार दिन साजरा केलेल्या पत्रकारांवर नवीन वर्षाच्या सुरुवातीला अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची माहिती मिळताच लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वतीने त्यांचे मोठे बंधू भैया सामंत, प्रतिष्ठित वकील विलास पाटणे, व्यापारी संघटनेचे श्री. भिंगार्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कुमार शेट्ये आदींनी पत्रकारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून पत्रकारांच्या भूमिकेचे समर्थन केले.
या आंदोलनास प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियासह विविध साप्ताहिकांसाठी काम करणारे पत्रकार देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, अभिजीत हेगशेटे, प्रमोद कोनकर, मनोज मुळ्ये, सुदेश शेट्ये, सुनील चव्हाण, भालचंद्र नाचणकर, हेमंत वणजु, अजित आंबेकर, सचिन देसाई, दत्ता महाडिक, श्रीकृष्ण देवरुखकर, जान्हवी पाटील, मुश्ताक खान, आनंद तापेकर, प्रणील पाटील, दीपक शिंगण, दीपक कुवळेकर, राजेंद्र चव्हाण, राजा चव्हाण, राजेश शेळके, राजेश कळंबटे, विशाल मोरे आदींसह सुमारे ६५ पत्रकार तसेच छायाचित्र पत्रकारांनी उपस्थिती दर्शवली.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केल्यानंतर पत्रकारांनी या संदर्भातील एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.