पर्यटन वाढीसाठी १३ जानेवारीपासून मार्लेश्वर महोत्सव
माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची माहिती
देवरुख (सुरेश सप्रे) : संपूर्ण राज्यात प्रसिद्घ असलेले श्री क्षेत्र मार्लेश्वर हे ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. त्याचा अधिक विकास व्हावा व पर्यटक, भाविक यांचे येणे जाणे वाढावे, यासाठी आपण पुढाकार घेत असून याचाच एक भाग म्हणून दि. १३ व १४ जानेवारी या कालावधीत मार्लेश्वर नगरीत दोन दिवसीय मार्लेश्वर महोत्सव भरवणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री रवींद्र माने यानी पत्रकार परिषदेत दिली. कोकणातील लोककलांचे सादरकरणाचा हा महोत्सवात आहे.
या महोत्सवाची संकल्पना युवा नेतृत्व प्रद्युम्न माने यांची असून रवींद्र माने, सौ. नेहा माने यांच्या नियोजनात हा महोत्सव रंगणार आहे. उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संगमेश्वर तालुका व मारळमधील ग्रामस्थ देवरुख क्रांती व्यापारी संघटना यासाठी सहकार्य करणार आहेत.
या महोत्सवात संगमेश्वरी बोली, हार्मोनियम सोलो वादन, जाखडी नृत्य, शाहिरी, खडे भजन, वारकरी भजन अशा लोककलांचे सादरीकरण होणार आहे. दि. १३ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
यानिमित्ताने स्थानिकांचे खाद्यपदार्थाचे स्टाॅल लागणार आहेत. मार्लेश्वर परिसरातील सोयी सुविधा,तसेच धारेश्वर धबधब्याकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग अशा अनेक सुधारणा करण्यासाठी आपण आराखडा तयार केला असुन शासनाच्या माध्यमातून यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती रवींद्र माने यांनी दिली.