महाराष्ट्रलोकल न्यूजस्पोर्ट्सहेल्थ कॉर्नर

पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृतीसाठी मुंबई ते दापोली सायकल प्रवास!

सायकल सफरीने पर्यावरणस्नेही गणपती उत्सव जनजागृती

दापोली : कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून गावी कोकणात जाण्यासाठी लगबग सुरु होते, वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करत लोकं गावी पोहोचतात. दापोली सायकलिंग क्लबचे सुरज भुवड, किरण भुवड, अजय मोरे आणि यश भुवड यांनी अंधेरी मुंबई ते दापोली असा २५० किमीचा प्रवास करण्यासाठी सायकलची निवड केली. या सायकल प्रवासात त्यांनी पर्यावरणपूरक गणपती उत्सव याबद्दल जनजागृती केली.

दापोली तालुक्यातील आंबवली गावातील सुरज भुवड व किरण भुवड, लाडघर येथील अजय मोरे आणि कोळथरे गावातील यश भुवड नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्याला असतात. हा २५० किमीचा सायकल प्रवास यश व किरण यांनी १६ सप्टेंबर २०२३ रोजी आणि अजय व सुरज यांनी १९ सप्टेंबर रोजी एका दिवसात पूर्ण केला. त्यांचा मार्ग मुंबई अंधेरी, पनवेल, कोलाड, माणगाव, महाड, लाटवण घाट, पालगड, दापोली असा होता. सकाळी ४ वाजता अंधेरीहून सुरु झालेला सायकल प्रवास रात्री ११ वाजता दापोली येथे संपला. या खडतर सायकल प्रवासात ठिकठिकाणी स्वागत, पाहुणचार आणि गप्पा गोष्टी झाल्या. पर्यावरण पूरक गणपती उत्सव हा संदेश घेऊन निघालेल्या त्यांना सायकल प्रवासासाठी शुभेच्छा मिळाल्या त्यामुळे सर्व क्षीण काही क्षणातच नाहीसा झाला आणि अजून स्फूर्ती मिळाली, असे त्यांनी सांगितले.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात हे चौघेजण सायकलचा वापर अधिक प्रमाणात करतात. ऑफिस आणि बाजारात जाण्यासाठी ते अनेक वेळा सायकलचा वापर करतात, त्यामुळे त्यांचे आरोग्य तंदुरुस्त बनले आहे, अनेक वर्षांपासून ते आजारी पडले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. गणपती बाप्पाची कृपा आणि सर्वांच्या सदिच्छा यामुळेच हा सायकल प्रवास यशस्वी सुखरुप झाला असे त्यांचे मत आहे. सर्वांनी तंदुरुस्त आरोग्यासाठी सायकल चालवावी असे त्यांनी आवाहन केले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button