महाराष्ट्र

पर्यावरण रक्षणासाठी सह्याद्री संकल्प सोसायटीला सह्याद्री पुरस्कार

पर्यावरण संवर्धनात महत्वपूर्ण योगदान

संगमेश्वर : सह्याद्री संकल्प सोसायटी या पर्यावरण रक्षण आणि संवर्धन यासाठी काम करणाऱ्या संस्थेस आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवशी दरवर्षी दिला जाणारा सह्याद्री पुरस्कार २०२३ प्राप्त झाला आहे. या पुरस्काराबद्दल सह्याद्री संकल्पवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ संजीव अणेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली सह्याद्रीच्या दऱ्या -खोऱ्यात आढळणारी जैवविविधता जपण्यासाठी तिचे संवर्धन करण्यासाठी तळमळीने झटणाऱ्या लोकांनी उज्वल भवितव्यासाठी पर्यावरण रक्षण या तत्वाला अनुसरून सह्याद्री संकल्प सोसायटी या संस्थेची स्थापना केली. विविध उपक्रमाद्वारे संस्थेने उल्लेखनीय यश मिळवले आहे. संस्थेने २०२१ मध्ये लॉकडाऊनच्या काळात पर्यावरण विषयक जनजागृती मध्ये खंड पडू नये म्हणून दर रविवारी सकाळी ११ वाजता निसर्गभान व्याख्यानमाला या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली.

सह्याद्रीच्या जैवविविधतेचे आणि पर्यावरणाचे विविध पैलू या व्याख्यानमालेद्वारे प्रकाशात आणले गेले आहेत. विविध क्षेत्रातील तज्ञ संशोधक यांची आतापर्यंत एकेचाळीस ऑनलाइन व्याख्याने या उपक्रमांतर्गत आयोजित केली असून त्याचा आतापर्यंत ११००० पेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला आहे.सेंद्रिय शेतीच्या प्रशिक्षणासाठी देखील लॉकडाऊनच्या काळात ७८०० जणांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले आहे. सह्याद्री परिसरातील सडे ही देखील अशीच एक महत्त्वाची पण दुर्लक्षित परिसंस्था असून त्याच्या संवर्धनासाठी देखील संस्था कार्यरत आहे. दीपकाडी , इपीजेनिया अशा अनेक प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे संशोधन आणि संवर्धन यासाठी संस्था कार्यरत आहे.

देवरुख आणि सह्याद्रीच्या परिसरातील फुलपाखरे वनस्पती प्राणी यांतील जैवविविध्य, त्यांचा शास्त्रीय अभ्यास आणि त्यावर आधारित माहितीचे संकलन लेखन संस्थेद्वारे केले जाते. हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम यावर संस्थेने उत्कृष्ट सर्वेक्षण केले आहे. सह्याद्रीचा शेतकरी म्हणून ओळख असणाऱ्या माडगरुड याच्या संशोधन आणि संरक्षणासाठी संस्थेने कंबर कसली आहे. रत्नागिरी परिसरातील रानभाज्या आणि रानफळे यांचा संस्थेने अभ्यास केला आहे. संस्थेच्या कामाला आंतरराष्ट्रीय ओळख असून फ्युचर अर्थ या स्वीडन या देशातील नेटवर्कचे सदस्यत्व सह्याद्री संकल्प सोसायटी या संस्थेला नुकतेच मिळाले आहे.

एक मार्च म्हणजेच आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सह्याद्री पुरस्कार २०२३ संस्थेस प्रदान करण्यात आला. संस्थेतर्फे सेक्रेटरी डॉ प्रताप नाईकवाडे यांनी तो स्वीकारला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी संस्थेचे सदस्य संगीता खरात, कुणाल अणेराव, प्रतीक मोरे उपस्थित होते. तर सृष्टीज्ञान या आमच्या सहकारी आणि मार्गदर्शक संस्थचे प्रशांत शिंदे यांची खास उपस्थिती लाभली होती. संस्थेतर्फे सर्व आयोजक, आमदार शेखर निकम, सौ पूजा निकम, चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के , मंगेश भोसले आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते .

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button