पहलगाम हल्लेखोरांना फाशी द्या : उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : काश्मिरमध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशाचं मन हेलावून टाकले आहे. या भ्याड कृत्याविरोधात उरण तालुका मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. या हल्ल्याचा तीव्र निषेध करत हल्लेखोर अतिरेक्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे सादर करण्यात आले.
उरण तालुक्यातील पत्रकारांनी स्पष्ट शब्दांत सम्हटले आहे की, काश्मीरमध्ये पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून जी निर्घृण कत्तल करण्यात आली, ती माणुसकीच्या नावालाही काळीमा फासणारी आहे. या घटनेतील निष्पाप पर्यटकांना संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शासनाने या अतिरेक्यांना पकडून तात्काळ फाशी देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, दिलीप कडू, सचिव अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.