पहिल्याच पावसात मुंब-गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल!
- पावसाळ्यात महामार्गावरील धामणी ते बावनदीपर्यंतच्या प्रवासात वाहनधारकांची कसरत
- अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची भीती
- चिखलामुळे सतत घडतायत अपघात
संगमेश्वर दि.६ ( प्रतिनिधी ): मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या आरवली ते बावनदी पर्यंतच्या विविध भागात ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे पावसाळ्यातील प्रवास खडतर बनला असून आवश्यक त्या उपाययोजना न केल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे महामार्ग बंद पडण्याची भीती वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.
पहिल्याच पावसात माती रस्त्यावर
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वांद्री नजीक डोंगराची खोदाई करताना त्याला टप्पे न दिल्याने या ठिकाणी गतवर्षी देखील माती रस्त्यावर आली होती. यावर्षी पहिल्याच पावसात मातीचा भला मोठा ढीग आणि मोठमोठे दगड रस्त्यावर आले आणि येथील मार्ग बंद पडला. सुदैवाने यादरम्यान वाहनांची येजा सुरू नसल्याने धोका टळला. या ठिकाणी ठेकेदार कंपनीने सद्यस्थितीत एकेरी मार्ग सुरू ठेवला आहे.मे अखेरीस झालेल्या मान्सूनपूर्व सरीमध्येच मातीचे ढिगारे महामार्गावर आले, परिणामी मुसळधार पावसाप्रसंगी महामार्ग बंद पडण्याची भीती वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.
गटारांचा पत्ता नाही
धामणी ते बावनदी दरम्यान घाई गडबडीने काँक्रीटचे काम पूर्ण करण्याचा सपाटा ठेकेदार कंपनीने लावला होता. हे काम करत असताना दर्जा कडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले. रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणा बरोबरच बाजूने आवश्यक असणाऱ्या गटारांचे काम अद्याप केले गेले नसल्याने पहिल्याच पावसात सर्व पाणी मातीसह रस्त्यावर येऊन अनेक दुचाकी चालकांना अपघात घडले . याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीकडे संपर्क साधल्यानंतरही, कोणतीही उपाययोजना केली गेली नाही याबाबत वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संरक्षण भिंत नसल्याने माती रस्त्यावर
राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले असल्याने ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी सर्वांचीच मोठी धावपळ सुरू आहे. किमान एक बाजू पूर्ण व्हावी यासाठी केवळ काँक्रिटीकरणाकडे लक्ष देणाऱ्या ठेकेदार कंपनीने डोंगरालगत संरक्षण भिंती उभारणे आवश्यक असताना त्याकडे पूर्णता दुर्लक्ष केले असल्याने डोंगराची माती पावसाच्या पाण्याबरोबर रस्त्यावर येऊन सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरत आहे.
डायव्हर्जन धोकादायक
धामणी ते बावनदी दरम्यान सध्या असणारी डायव्हर्जन अत्यंत धोकादायक असून पावसाळ्यापूर्वी ठेकेदार कंपनीने येथे कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत. डायव्हर्जनच्या ठिकाणचा रस्ता डांबरी करणे आवश्यक असताना त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले आहे. अनेक ठिकाणी डायव्हर्जन परिसरात रस्त्याला भले मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे चिखल मिश्रित पाणी साचून दुचाकीस्वारांना अपघात घडत आहेत. कुरधुंडा जवळील एका डायव्हर्जनवर दोन दुचाकी स्वार घसरून अपघात घडला. याबाबत ठेकेदार कंपनी जवळ संपर्क साधल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्याऐवजी ‘ फक्त दोनच दुचाकीस्वार पडले ना?’ अशा प्रकारचे बेजबाबदार प्रश्न विचारून खिल्ली उडविण्यात आल्याचे,अपघात ग्रस्त दुचाकीस्वारांनी सांगितले.
पैसा फंडजवळ मोठा धोका
संगमेश्वर नजीकच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल येथे मार्च महिन्याच्या सुरुवातीला उड्डाण पुलाच्या कामासाठी मोठा चोर खोदून ठेवण्यात आला आहे. जर पुढील काम करायचेच नव्हते, तर हा चर खोदला कशासाठी ? असा प्रश्न वाहनचालकाने उपस्थित केला आहे. पावसात या चरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठुन जीवित हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हा भला मोठा चर तातडीने न बुजवल्यास प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशाराही वाहन चालकांनी दिला आहे. याच ठिकाणी जे डायव्हर्जन तयार करण्यात आले आहे, तेथे भला मोठा खड्डा तयार झाला असून वाहने त्यावरून जाताना सातत्याने आपटत आहेत .
शास्त्री पुलावर भुलभूलय्या!
शास्त्री पुलानजीक सध्या तीनही पूलांवरून वाहतूक सुरू असून येथील उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास जाण्यापूर्वीच हा मार्ग वाहतुकीस खुला केल्याने येथे फार मोठा भुलभुलय्या तयार झाला आहे. कोणते वाहन कोठून येते? याचा पत्ता नसल्याने आजवर येथे दुचाकी आणि विविध वाहनांना अपघात घडले आहेत. दोन दुचाकी स्वारांना घडलेल्या अपघातात अद्यापही दुचाकी वरील दोघेजण रुग्णालयात कोमा स्थितीत उपचार घेत आहेत. शास्त्री पुलावरील हा भुलभुलय्या तातडीने बंद करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
अभियंत्यांचे दुर्लक्ष
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली ते बावनदी दरम्यान कामावर देखरेख करण्यासाठी ज्या अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचे या कामावर पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे. ठिकठिकाणी अपघात सदृश्य स्थिती असताना पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करून न घेतल्याने या अभियंत्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी बरोबरच आवश्यक उपाययोजना करून घेण्यात अपयशी ठरलेल्या अभियंत्यांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसह, रस्ते विकास मंत्रालयाकडे लिखित स्वरूपात तक्रार करणार असल्याचे परशुराम पवार , संगमेश्वर येथील रिक्षाचालक, पादचारी यांनी नमूद केले आहे.