पावसाळी वेळापत्रकाच्या पहिल्याच दिवशी चुकली ५० पेक्षा अधिक प्रवाशांची जनशताब्दी एक्सप्रेस!

रत्नागिरी रेल्वे स्थानकातील प्रकार; प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळ न तपासल्याने उडाला गोंधळ
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर शनिवारपासून (१० जून ) पावसाळी वेळापत्रक लागू झाले असून नवीन वेळेनुसार गाड्या धावत आहेत. रेल्वेच्या नियमानुसार प्रवाशांनी प्रवासाआधीच्या वेळ तपासून न घेतल्याने शनिवारी सायंकाळी मुंबईकडे जनशताब्दी एक्सप्रेसने जाणाऱ्या जवळपास ५० हून अधिक प्रवाशांची ट्रेन चुकली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रकार झाला.
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक आज शनिवारपासून लागू झाले. आज पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला. खरे पाहता पावसाळी वेळापत्रक कोकण रेल्वेकडून मागील अनेक वर्षांपासून राबवले जाते. त्यामुळे प्रवाशांनी हे वेळापत्रक लागू असलेल्या कालावधीत प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीची अपडेटेड वेळ तपासूनच जाणे अपेक्षित आहे. मात्र शनिवारी पहिल्याच दिवशी त्याबाबत अलर्ट नसलेल्या प्रवाशांची शनिवारची मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस आधीच निघून गेली होती.
आरक्षित तिकिटावर जुनी वेळ नोंदवलेली असल्याने गाडी गाडी पावसाळी वेळापत्रकातील ४.५५ या वेळेनुसार आधीच निघुन गेली. यावरुन प्रवाशांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उपस्थित अधिकार्यांना विचारणा केली; मात्र अपेक्षित उत्तर न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
पावसाळी वेळापत्रकानुसार दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या धावू लागल्या आहेत. सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास मडगावहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस (12052) पावसाळी वेळापत्रकानुसार आधीच दाखल झाली. प्रवाशांनी गाडीचे आरक्षण करताना त्या तिकिटावर पावसाळी वेळापत्रकानुसार वेळे नव्हती. या गोंधळात पन्नासहून अधिक प्रवाशांची गाडी चुकली. या प्रकारानंतर प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरील तिकिट घराकडे धाव घेतली. तेथील अधिकार्यांनीही तिकिटावरील वेळेची नोंद ही वरिष्ठपातळीवरून होत असल्याचे सांगत प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी चुकलेले प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे काही काळ त्यांनी गोंधळ घातला.
