प्रशांत पाटील यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी : शरद पवार
उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील हे राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीचे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते. पक्षाला तळागाळात पोहोचविण्याचे काम प्रशांत पाटील यांनी केले असून पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकता पक्षातून गेला त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रशांत पाटील सारखा सच्चा कार्यकर्त्याच्या निधनामुळे पक्षाची खूप मोठी हानी झाली आहे, असे भावनिक उद्गार राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीचे संस्थापक तथा नेते शरदचंद्र पवार यांनी उरण येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आक्रमक व धडाकेबाज नेतृत्व असलेले उरणचे सुपुत्र प्रशांत भाऊ पाटील यांचे २० जून २०२४ रोजी आकस्मिक निधन झाले. त्या अनुषंगाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तथा माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी उरण शहरातील कामठा येथील प्रशांत भाउ पाटील यांच्या निवास जाउन प्रशांत पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.या प्रसंगी शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करून प्रशांत पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी शरद पवार भावूक झाले होते. प्रशांत पाटील यांनी पक्षासाठी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते पुढे असायचे.त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. हे दु:ख पचविण्याची परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना ताकद देवो या शब्दात शरद पवार यांनी श्रध्दांजली अर्पण केली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोष घरत, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस विकास नाईक,राष्ट्रवादीचे उरण विधानसभा अध्यक्ष – गणेश नलावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज भगत,शहराध्यक्ष मंगेश कांबळे, युवक कार्याध्यक्ष समाधान म्हात्रे,युवक अध्यक्ष सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते समीर सुर्वे यांच्यासह प्रशांत पाटील यांच्या पत्नी, मुले, नातेवाईक, मित्र परिवार तसेच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.